पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 22 हजार ग्रामसेवक एक दिवसाचे वेतन देणार : कमलेश बिसेन

0
15

गोंदिया,दि.११: कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे या भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनीही कर्तव्य भावनेने मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्त जनतेच्या मदतीसाठी राज्यातील ग्रामसेवक एक दिवसाचे वेतन देणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पत्र देवून राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची विनंती केली आहे. जवळपास 3 कोटी रुपयांची मदत ग्रामसेवक संवर्ग या माध्यमातून करणार आहे. सध्या पूरग्रस्त भागात ग्रामसेवक युनियनच्या शाखा मदतकार्यात अग्रेसर असून पडेल ती कामे करून पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहचवत आहेत, अशी माहिती युनियनचे जिल्हा अध्यक्ष तथा विभागीय सचिव कमलेश बिसेन एकनाथ ढाकणे व सरचिटणीस दयानंद फटिंग यांनी दिली.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील अभूतपूर्व पुरपरिस्थितीमुळे लाखो लोकांना फटका बसला आहे. अशावेळी माणुसकीच्या नात्याने आपल्याच बांधवांना मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तळागाळात काम करणार्‍या ग्रामसेवकांनी याआधीही नैसर्गिक आपत्ती काळात संवेदनशीलता दर्शवत मदतीचा हात पुढे केला आहे. लातूर किल्लारी भूकंप, केरळमधील पूरपरिस्थिती अशा अनेक आपत्तीच्या प्रसंगात ग्रामसेवकांनी मदत करून योगदान दिले आहे. राज्यातील जलयुक्त शिवार अभियान, दुष्काळ निवारण अशा कामांसाठीही युनियनने वेळोवेळी मदत केलेली आहे. ग्रामसेवक म्हणून काम करताना प्रत्येकाला स्थानिक अडीअडचणी, जनमानसाला भेडसावणार्‍या प्रश्नांची चांगलीच जाण असते. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ अशी महान शिकवण आपल्या संस्कृतीने दिलेली आहे. देशाप्रती व समाजाप्रती संवेदना जागृत असलेला ग्रामसेवक संवर्ग कर्तव्यापलिकडे जावून योगदान देत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामसेवकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे घेतलेला मदत करण्याचा निर्णय कृतार्थ करणारा आहे, अशी भावना कमलेश बिसेन यांनी व्यक्त केली आहे.