ईओंनी दिला कंत्राटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अधिकार

0
21

विस्तार अधिकाऱ्यांना डावलून गटसमन्वयकांचा प्रभार

गोंदिया,दि.12 : शिक्षणाची व्याप्ती अधीक वाढून सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यादृष्टीने शासनाने सर्व शिक्षा अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शाळांना निधी देण्यात येतो. त्याची देखरेख पंचायत समिती स्तरावरून करण्याकरिता गटसाधन केंद्रांची निर्मीती करण्यात आली. अमलबजावणी आणि नियंत्रणाकरिता गटसमन्वय हे पद निर्माण करण्यात आले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत येणारा निधी, अर्थसंकल्प, शिक्षण, शाळा अनुदान, शिक्षण अनुदान, इयत्ता १ ते १२ पर्यंतचे विविध प्रशिक्षण, धनादेशावर स्वाक्षरी करणे, शाळा दुरुस्ती, गणवेश अशी जबाबदारीची कामे गटसमन्वयकाकडे असतात. सध्यास्थितीत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, आमगाव, देवरी, सालेकसा, तिरोडा आणि गोंदिया या  सहा तालुक्यांत गटसमन्वय नाहीत. त्यामुळे त्या गटसाधन केंद्रांचा प्रभार संबंधीत पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे होता. त्यातील पाच ठिकाणचा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे असलेला गटसमन्वयकांचा प्रभार काढून शिक्षणाधिकारी यांनी सहा महिन्याच्या कंत्राटी पदावर असलेल्या विषय साधनव्यक्तींना सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधी टिपणी तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील कसलाही विचार न करता एवढे जोखमीचे आणि आर्थीक व्यवहार असलेले पद सहा महिन्यांकरिता कंत्राटी तत्वावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सोपविले. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने २९ जानेवारी २००३ रोजी काढलेल्या परिपत्रकात ज्या गटसाधन केंद्रात गटसमन्वयकाचे पद भरले नसल्यास तेथील विस्तार अधिकारी किंवा केंद्र प्रमुख यांच्याकडे गटसमन्वयकाचा प्रभार देण्यात यावा, असे सूचविण्यात आले आहे. असे असताना देखील गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सहा महिन्यांकरिता असलेल्या विषय साधनव्यक्तींना जोखीम स्विकारून गटसमन्वयकाचा प्रभार का देण्यात आला हे समजण्यापलीकडचे आहे. यात मोठा घोळ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कुणाला कुठचा प्रभार

शिक्षणाधिकारी यांनी ज्या सहा महिन्यांच्या कंत्राटी विषय साधन व्यक्तींना गटसाधन केंद्राचा प्रशासकीय व आर्थिक अधिकार दिला. त्यात अर्जुनी मोरगावकरिता एस. एच. शहारे, आमगाव एस. सी. बोपचे, देवरी डी. टी. कावळे, सालेकसा बी. डी. चौधरी, तिरोडा बी. डी. मिश्रा यांचा समावेश आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांना गोंदियाचा विसर

गोंदिया पंचायत समितींतर्गत असलेल्या गटसाधन केंद्राच्या गटसमन्वयक पदाचा प्रभार विस्तार अधिकारी श्रीमती वैष्णव यांच्याकडे होता. मात्र त्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे तेथील प्रभार गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे. उल्लेखनीय म्हणजे गोंदिया पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्याकडेच आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी इतर पंचायत समित्यांतील प्रभार विषय साधन व्यक्तींकडे सोपविला असताना गोंदियाचा प्रभार मात्र आपल्याकडेच ठेवला. त्यामुळे शंका उपस्थित होत आहे.

३० सप्टेंबरला संपणार करार

ज्या विषय साधन व्यक्तींना गटसमन्वयक पदाचा प्रभार शिक्षण विभागाने सोपविला आहे. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहा-सहा महिन्यांचा करार असतो. त्यांची नियुक्ती एप्रील महिन्यात झाली. त्यामुळे ३० सप्टेंबर रोजी त्यांचा करार संपुष्टात येणार आहे. त्यानंतर दोन दिवसांची उसंत दिल्यानंतर पुन्हा त्यांचा करार करावा की नाही, हा निर्णय जिल्हा परिषद घेणार आहे. मात्र असे असताना देखील त्यांना गटसमन्वयक पदाचा प्रभार सोपविल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांवर अन्याय

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने २९ जानेवारी २००३ रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले की, ज्या तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असल्यास त्या तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी प्रभार असल्यास ते गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यापैकी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या संयुक्त नावे खाते उघडण्यात यावे. जर शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समितीत कार्यरत नसेल तर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याऐवजी त्या पंचायत समितीतील ज्येष्ठ केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या नावे गटसाधन केंद्राचे संयुक्त खाते उघडण्यात यावे. जिल्ह्यातील पचायत समित्यांत शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असताना त्यांना प्रभार न देता कंत्राटींना दिल्याने विस्तार अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे.