अर्जुनी मोर नगरपंचायतीला नियमित मुख्याधिकारी द्या

0
14

अर्जुनी मोरगाव ,दि.१२ :: शहराचा सर्वांगीण विकासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असललेल्या अर्जुनी मोर नगर पंचायत मध्ये मुख्याधिकारी नसल्याने अनेक विकास कामे थांबली आहेत. तथा जनतेची ही कामे रेंगाळली आहेत. नगर पंचायतीला नियमीत मुख्याधिकारी देण्यात यावा यासाठी नगराध्यक्ष किशोर शहारे यांचे नेतृत्वात ७ ऑगस्ट रोजी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. नियमीत मुख्याधिकारी न मिळाल्यास नगर पंचायत कार्यालयाला ताला ठोकण्याचा ईशारा ही देण्यात आला आहे. अर्जुनी मोर हे तालुक्याचे सर्वात मोठे ठिकाण आहे. पूर्वीची ग्रामपंचायत बरखास्त होऊन सन २0१५ ला नवनिर्मीत नगर पंचायतीची स्थापना करण्यात आली. नगर पंचायत स्थापने पासूनच अर्जुनी मोर नगर पंचायतीला मुख्याधिकारी पदाचे जणू ग्रहणच लागले आहे. स्थापनेच्या चार वर्षात या नगर पंचायतीमध्ये प्रभारी घेवून तब्बल २0 च्या जवळपास मुख्याधिकारी लाभले. मात्र, अजूनपर्यंत या नगर पंचायतीला नियमीत मुख्याधिकारी मिळाला नाही. नियमीत मुख्याधिकारी नसल्याने शहरातील सतरा प्रभागाचा जणु विकासच खुंटलयासारखा झाला आहे. नगर पंचायत अर्जुनीची विकास कामे पार पाडण्यासाठी नियमित मुख्याधिकारी यांची अत्यंत आवश्यकता आहे. २४ जुलै २0१९ रोजी मुख्याधिकारी किरण बगडे यांची बदली झाल्यापासून नगर पंचायतला मुख्याधिकारी नसल्याने नपं क्षेत्रात मंजूर विकासकामे रखडली आहेत. मुख्याधिकारी नसल्याने कर्मचार्‍यांचे वेतन सुद्धा थांबले आहेत. शहराला पाणी पुरवठा करणारी संस्था ही नपंला हॅन्डवर करण्याचा ठराव पारीत झाला आहे. मात्र, मुख्याधिकारी अभावी हा महत्वाचा कामही थांबला आहे. त्यामुळे नगर पंचायत अर्जुनी मोरला पांच दिवसाच्या कालावधीत नियमित मुख्याधिकारी उपलब्ध करून देण्यात यावे. अन्यथा सर्व नगरसेवक, नगरसेविका जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करतील व नगर पंचायतीला ताला ठोको आंदोलन करतील अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष किशोर शहारे, उपाध्यक्ष हेमलता घाटबांधे, नगरसेवक प्रकाश शहारे, यमुताई ब्राम्हणकर, प्रज्ञा गणवीर, वंदना शहारे, वंदना जांभुळकर उपस्थित होत्या.