विद्यार्थ्यांनी मोठे होऊन वैज्ञानिक व्हावे-नगराध्यक्षा योगिता पिपरे

0
13
गडचिरोली,दि.15 – वैज्ञानिक दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांचा विकास साध्य करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान विषयाची आवड निर्माण करून त्यांना विकासाची जोड देणे महत्त्वाचे आहे. शालेय जीवन व्यतित करतांना विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अंगभूत ज्ञान विकसीत करीत विद्यार्थ्यांनी मोठे होऊन वैज्ञानिक व्हावे, असे प्रतिपादन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा गडचिरोली येथे शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या उपक्रमांतर्गत नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा पिपरे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या उद्घाटक न.प.च्या नगराध्यक्षा योगिता पिपरे होत्या. तर अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या शिक्षण समिती सभापती वर्षा बट्टे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न.प.चे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक संजय मेश्राम, नगरसेविका रंजना गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी यशाची पायरी चढतांना कोणत्याही अहंकारात न जाता शैक्षणिक जीवनात सातत्य ठेवावे. समाजासाठी कार्य करण्याची धडपड अंगी बाळगावी. विकासाच्या वाटेवर सतत कार्यरत असावे. सामान्य परिस्थितीतून मिळविलेले यश निरंतर आपल्या ध्यानात ठेवावे. शाळेत प्रयोगशाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेतून भविष्यात वैज्ञानिक होण्याचे ध्येय बाळगावे, असेही नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या.यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, बुट आदी शैक्षणिक साहीत्याचे वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनीसुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कर्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंगला रामटेके यांनी केले. संचालन संध्या चिलमवार तर आभार पेंदाम यांनी मानले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप व-हाडे, शा.व्य.स.उपाध्यक्षा मिस्त्री,  शा .व्य.स. सर्व सदस्य, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.