15 वर्षे अध्यापनाचे काम करूनही पगार ‘शून्य’, स्वातंत्र्य दिनी शिक्षकाची आत्महत्या

0
16

संतोष रोकडे।अर्जुनी मोरगाव,.१५ः~शासनाच्या हलगर्जीपणाचा अजून एक निष्पाप बळी आज स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात गेला असून १५ वर्षे अध्यापनाचे प्रामाणिकपणे काम करूनही पगार न मिळाल्याने विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रा.केशव गोबाडे यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी विष प्राशन करून आत्महत्या केली. गरीबी, नैराश्य व सहनशीलता संपल्यानेच गोबाडेनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

आदिवासी ज्युनियर कॉलेज, झाशीनगर, मोरगाव अर्जुनी, जि.गोंदिया येथे गोबाडे हे विनावेतन कार्यरत होते. शासनाच्या वेतन अनुदान दिरंगाई व हलगर्जीपणामुळे ते नैराश्येत होते. वेतन नसल्याने मागील 6 वर्षांपासून त्यांची पत्नी देखील त्यांच्या मुलासह त्यांना सोडून गेली होती.लहानपणीच आईचे निधन झालेले होते. फक्त वडील होते आणि त्यात 1 रुपया वेतन नाही. अनुदान येईल या आशेवर ते जगण्याचा प्रयत्न करीत होते. पण आचार संहिता जवळ येऊन ठेपलेली असतांनाही शासन निर्णय निघत नव्हता. या सर्व तणावाखाली त्यांनी गुरीवारी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. त्यांच्या आत्महत्येनंतर गोंदिया जिल्ह्यातील विनाअनुदानित शिकक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.