शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा- पालकमंत्री अतुल सावे

0
17

हिंगोली, दि. 16 : प्रत्येक सामान्य नागरिकांना स्वत:च्या मालकीची घरे मिळावी हिच शासनाची इच्छा असून ग्रामीण नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
मौजे लिंगदरी ता. सेनगांव येथे आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत घरकूल लोकार्पन व भूमीपूजन सोहळा कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. पी. घुले, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल) श्री. गणेश वाघ, तहसिलदार जिवककुमार कांबळे, लिंगदरी गावचे सरपंच विठ्ठल राठोड, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विकासापासून वंचित राहिलेली सुमारे 1 हजार गावे दत्तक घेतली असून त्यातील हे मौजे लिंगदरी गाव असून एकूण एकशे अकरा घरकुल मंजुर असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. येथील नागरिकांप्रमाणेच राज्यातील प्रत्येक विकासापासून वंचित असलेल्या गावातील ग्रामस्थांना सुख सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने सुरु केलेल्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामान्य नागरिकांना सुमारे 5 लाख रुपयांचा विमा मोफत मिळणार असून या योजनेतंर्गत सुमारे 10 कोटी कुटुंबांना आरोग्याच्या मोफत सुविधा देण्यात येणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच उज्वला गॅस योजना, मुद्रा लोन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, अशा अनेक शासनाच्या कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात लिंगदरी गावचे उपसरपंच सुमित राठोड यांनी लिंगदरी गाव विकासाकडे वाटचाल करत असून या गावाने शासनाच्या जलयुक्त शिवार योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, मनरेगा योजना आदी शासनाच्या योजनांचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते लाभ मिळालेल्या गावातील ग्रामस्थांना प्रातिनिधीक स्वरुपात शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले तसेच महिला बचत गटांना फिरता निधी मंजुर प्रमाणपत्र, शेतकरी गटांचे नोंदणी प्रमाणपत्र , जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र व महाराष्ट्र हरित सेना सदस्य प्रमाणपत्र आदि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शेवटी आभार मुख्याध्यापक श्री. मुळे यांनी मानले.