पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी २३ ऑगस्टला पाणी परिषद-खा.मेंढे

0
24

भंडारा,दि.18ः-  भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी भंडारा शहरात पाणी परिषदेचे आयोजन २३ ऑगस्ट रोजी करण्यात आले असून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले. लोकसहभाग, राज्य आणि केंद्र सरकार व प्रशासन यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षाच्या कालावधीत पाणी प्रश्नासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. या पाणी परिषदेत मतदारसंघातील सर्वच सरपंच, तज्ज्ञ, सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सरपंचांकडून सूचना मागविण्यात आल्या असून त्या सूचना पक्ष यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांना पाठवून त्याद्वारे प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.
मागील सात वर्षांपासून अडगळीत पडलेल्या महत्वाकांक्षी ‘भेल’ प्रकल्पाचे काम कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे अद्यापपर्यंत सुरू होऊ शकले नाही. आता कंपनीची स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून लवकरच प्रकल्पाच्या कामाला गती येईल, अशी माहिती भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. सुनील मेंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला भंडारा-गोंदिया लोकसभा प्रभारी बाळा अंजनकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदिप पडोळे, प्रशांत खोब्रागडे आदी उपस्थित होते.
सन २0१२ मध्ये तत्कालिन केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांच्या पुढाकारातून साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन मोठय़ा थाटात करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी ४७६ एकर जमीन संपादीत करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात आवारभिंतीचे काम झाले. परंतु, सन २0१४ मध्ये सत्ता परिवर्तन होताच हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. या प्रकल्पामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात सोडविता आला असता. परंतु, या सात वर्षाच्या काळात एकाही लोकप्रतिनिधीने यासाठी प्रयत्न केले नाही. या प्रकल्पाची नेमकी स्थिती काय आहे, यावर भाजपचे तत्कालिन खासदार नाना पटोले व माजी केंद्रीय मंत्री व खा. प्रफुल पटेल हे एकमेकांवर टीका करीत होते. परंतु, वस्तुस्थिती जनतेसमोर येत नव्हती.
लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात खा. सुनील मेंढे यांनी संसदेत या प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर माहिती देताना खा. सुनील मेंढे म्हणाले, भेल कंपनीची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे मुंडीपार येथील प्रकल्पाचा विस्तार होऊ शकला नाही. हा प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी आपली भूमिका आहे. भेल कंपनीच्या डायरेक्टरांशी लवकरच दिल्ली येथे बैठक होणार असून त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल. त्यातून दोन्ही जिल्ह्याचा रोजगाराचा प्रश्न मिटेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
धान उत्पादक क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी भंडारा-तुमसर-बालाघाट हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित व्हावा याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे खा. मेंढे म्हणाले. याशिवाय नागझिरा, कोका अभयारण्यातील पर्यटन विकास, तांबे पितळवरील जीएसटी कमी करणे, भंडारा-गोंदियामध्ये तांदूळ संशोधन केंद्राची स्थापना करणे आदींबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खा. मेंढे यांनी दिली.