देशातील सर्व कुटुंबाना 2024 पर्यंत मिळणार ‘नल से जल’- केंद्रीय राज्यमंत्री कटारिया

0
46

• पाणी परिषदेचे उद्घाटन
• मामा तलाव क्षमता वाढविण्यासाठी सहकार्य
• धापेवाडा सुरेवाडा राष्टीय प्रकल्पासाठी प्रयत्न
• रेन र्वाटर हार्वेस्टींगसाठी योजना
भंडारा, दि. 23 :– देश भरात दर वर्षी 1170 मी.ली. पाऊस पडतो. जगाच्या पाण्याच्या तुलनेत आपल्या देशात 4 टक्केच पाणी आहे. त्यातही 3 टक्के पाणी खारे आहेत. उर्वरीत 1 टक्के पाण्यामधील 80 टक्के भाग शेतीच्या पाण्याचा आहे. पिण्यासाठी केवळ 20 टक्के भाग उपयोगी आणला जातो. भविष्याच्या दृष्टीने ही बाब अतीशय चिंताजनक असून पावसाचे पाणी वाचविण्याच्या योजना अमलात आणणे गरेजेचे आहे. या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असून रेन वॉटर हार्वेस्टींग साठी देशभरात योजना राबवीली जात आहे. देशातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी घरपोच मिळावे, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अग्रही असून 2024 पर्यंत सर्वांना ‘नल से जल’ या योजनेअंतर्गत पिण्याचे शुध्द पाणी घरपोच मिळेल अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी दिली. हेमंत सेलिब्रेशन हॉल भंडारा येथे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील जल व्यवस्थापन व स्वच्छता करण्याच्या दृष्टीने आयोजित पाणी व स्वच्छता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. परिणय फुके होते. खासदार व आयोजक सुनील मेंढे, अध्यक्ष म्हाडा तारीक कुरेशी, आ. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे, आ. राजेश काशिवार, जिल्हाधिकारी (भंडारा) डॉ. नरेश गिते, जिल्हाधिकारी (गोंदिया) डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी (भंडारा) रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी (गोंदिया) डॉ राजा दयानिधी, कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अविनाश सुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

देशात पडणाऱ्या पावसाचे केवळ 8 टक्के पाणी आपण वापरतो. उर्वरीत पाणी वाहुन जाते. हे पाणी अडवण्याची व जिरवण्याची आवश्यक्ता आहे. देशाच्या अनेक राज्यात खुप पाऊस होतो. काही राज्यात अजिबात पाऊस होत नाही. ही बाब लक्षात घेता देशातील नदया जोडण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, या योजनेत देशातील 30 मोठया नदया जोडल्या जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील काही नदयांचा समावेश असल्याचे कटारिया यांनी सांगीतले. देशात 79 हजार कोटी खर्च करून 11 लाख रेन वॉटर हार्वेस्टींग पॉईंट बसविले जाणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्र सरकार राष्ट्रीय पाणी धोरण तयार करित असल्याचे सांगुन कटारिया म्हणाले की, देशाचा शेतकरी सक्षम करण्याला या धोरणात प्राधान्य असणार आहे. गोसेखुर्द या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा असून, धापेवाडा व सुरेवाडा या प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भंडारा-गोंदिया मामा तलावाचे जिल्हे असून सिंचनामध्ये मामा तलावाचे महत्वाचे योगदान आहे. या तलावाच्या क्षमतावाढीसाठी जलशक्ती मंत्रालय निश्चित पुढाकार घेईल असे आश्वासनही त्यांनी दिले. पाणी परिषदेच्या माध्यमातुन पाणी वाचवा ही चळवळ उभी राहात आहे. ही आनंदाची बाब असून यात लोकसहभाग वाढावा असे आवाहनही त्यांनी केले.

नाग नदीच्या पाण्यामुळे वैनगंगा नदी प्रदुषित होत अाहे. नाग नदी शुध्दीकरणाचा प्रकल्प उभारला जात आहे. सांडपाण्यावर जीथल्या तिथे ट्रिटमेंट करून शुध्द पाणी नाग नदीत सोडण्यासाठी एक हजार कोटीचा निधी लागणार आहे. हा निधी केंद्राने उपलब्ध करून द्यावा अशी विनंती पालकमंत्री डॉ फुके यांनी केली. भेल प्रकल्पाकडे असलेली 480 एकर जागा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी भेलने एमटीडीसीला परत करावी. अशी मागणी करीत ड्रेजिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धरणातील गाळ काढण्याची योजना शासनाने बनविली असून यात गोसेर्खुदचा समावेश करण्यात आला आहे. हा गाळ शेतीसाठी उपयुक्त असून यामुळे दुषित पाण्याची समस्या दुर करण्यासाठी मदत होईल असेही डॉ फुके म्हणाले.

पाणी परषिदेचे प्रास्ताविक खा. सुनिल मेंढे यांनी केले. पाण्याने समृध्द असलेल्या भंडारा गोंदिया जिल्हयात एके काळी 1300 एम.एम पाऊस पडत होता. आज 800 एम.एम पाऊस होतो. चौरास पट्टा हा पाण्याने समृध्द होता. आता तेथील पाणी पातळी सुध्दा खाली गेली आहे. या पाणी समस्येवर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी ही पाणी परषिद आयोजित केली आहे. सिंचनातून समृध्दीकडे या तत्वावर पुढील पाच वर्ष काम करायचे आहे. यामध्ये नाला खोलीकरण, मामा तलाव खोलीकरण, जल पुर्नभरण, नाला रुंदीकरण, नाले सफाई, पाणी अडवा पाणी जिरवा, सांडपाणी प्रक्रिया करून पाण्याचा पुन:वापर व सगळयात महत्वाचे म्हणजे वृक्षारोपण या अनुषंगाने काम केले जाणार आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मंडळी व स्वयंमसेवी संस्थांची मदत लागणार आहे. यासगळया आयोजनामागे नागरिकांना भविष्यात पाण्याच्या समस्येचा सामना करू लागु नये हा उद्देश असल्याचे खासदार मेंढे म्हणाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुकुंद ठवकर यांनी केले. आभार उल्हास फडके यांनी मानले. या कार्यक्रमास भंडारा गोंदीया जिल्ह्यातील पदाधिकारी, सरपंच व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.