रोजगार हमी योजनेच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार!

0
43

सडक अर्जुनी,दि.24ः-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राका/पिपरी ग्रामपंचायतीमध्ये सन २0१0 ते २0१६ या काळात रोजगार सेवक, ग्रामपंचायत ऑपरेटर व ग्रामपंचायत सचिव यांच्या संगनमताने लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समाजसेविका अश्‍विनी अशोक चांदेवार यांनी केला आहे.
माहिती अधिकाराच्या आधारांतर्गत मिळालेल्या माहितीवरून त्यांनी या प्रकरणाची उकल केली आहे. राका/पिपरी ग्रामपंचायतीमध्ये सन २0१0 ते २0१६ या काळात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात तत्कालीन रोजगारसेवक नशिम शेख, तत्कालीन ऑपरेटर दिनेश शालिकराम मेंढे व तत्कालीन सचिव यांनी संगनमताने बोगस मजुरांचे हजेरी लावून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. मृत व्यक्तीला जिवंत असल्याचे दाखवून पैशाची उचल केली आहे. एका कमी वयाचे मुलीचे नाव रोजगार हमी योजनेच्या कामावर दाखवून नियमांचे पालन न करता रोजगार सेवक व सचिव यांनी पैसे काढल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर एका शिक्षक कर्मचार्‍यांचे नाव रोजगार हमीचे हजेरी पटावर लाऊन मजुरी काढल्याचे ही यात स्पष्ट झाले आहे. तर तो शिक्षक शाळेतही नोकरी करुन रोजगार हमी योजनेच्या कामावर गेला कसा? हा संशोधनाचा विषय आहे. चांदेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार रोजगारसेवकाने आपल्या घरच्या कुटुंबातील व्यक्तीचे हजेरी लावून पैसे काढल्याचे दिसत आहे. एका इसमाचे दोन बोगस पत्नी दाखवून पैशाची उचल केली आहे, तरी संबंधित व्यक्तींकडून या सहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांची अफरातफर केल्याचे दिसून येत असून याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांनी २0१0 ते २0१६ या काळातील करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून भ्रष्टाचार उघडकीस आणून दोषींवर कारवाही करण्याची मागणी अश्‍विनी चांदेवार यांनी केली आहे.
या प्रकरणावरून राका ग्रामपंचायतची चौकशी झाल्यास अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. तेव्हा सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी रोजगारसेवक, ऑपरेटर व ग्राप सचिवावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर तसे निवेदनही गटविकास अधिकारी सडक अर्जुनी व जिल्हा परिषद गोंदिया यांना देण्यात आले आहे.