गडचिरोलीची तारूण्यातील कणखर वाटचाल

0
54

(गडचिरोली जिल्हयाच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष लेख)

– सचिन अडसुळ,जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली

 प्रत्येकजणच चाळीसीमधील तारूण्यामध्ये आपल्या आयुष्याच्या उभारणीसाठी कणखर वाटचाल करत असतो. आज गडचिरोली जिल्हा चाळीसीमधील 37व्या वर्धापन दिनात गतीने विकासाकडे झेप घेत आहे. जिल्हयाची ओळख काय असेल तर याचे उत्तर आजपर्यंत नक्षलग्रस्त जिल्हा म्हणूनच सर्वदूर आहे. मग विकासाची चर्चा त्याच ठिकाणी थांबून बाकी विषयांवर चर्चा आजही होतेय. आता जिल्हयाचे चित्र बदललय. आपण आता विकासावर बोलतोय. पदाधिकारी, प्रशासन व जणता यांना चांगली साथ मिळतेय ती स्थानिक तसेच राष्ट्रीय विविध माध्यमांची. कारण गडचिरोलीची ओळख निर्माण करण्यासाठी जिल्हयाचे सादरीकरण महत्त्वाचा पैलू आहे. आज जिल्हयात असंख्य विकासात्मक कामे झालेली आहेत. जिल्हा गतीने काम करत असताना विविध माध्यमांच्या सहाय्याने जिल्हयातील जंगल, संस्कृती, शेती, दळणवळण, शिक्षण, आरोग्य याबाबत सकारात्मक बातम्या जिल्हयाच्या बाहेर जात आहेत. यातूनच आज जिल्हयातील विकास कामांमधील यशापयश चांगल्या पध्दतीने मांडले जात आहे. गडचिरोली जिल्हयाची परंपरेने  असलेली ओळख पुसण्यात जेवढा वाटा प्रशासनाचा आहे, तेवढाच पोलीस यंत्रणेचाही आहे. आज आदिवासी बहूल, वनाने अच्छादीत, नक्षल प्रभावीत जिल्हयातील, ग्रामीण भागात  108 रूग्णवाहिका, ग्रामसेवक, तलाठी, तहसिलदार, गट विकास अधिकारी विकास कामानिमित्त जात आहेत. यासाठी  प्रशासन आणि पोलीस दलाने केलेले कार्य मोलाचे आहे.

जिल्हयातील पर्जन्यमान, वने आणि दुर्गम भाग विकास प्रक्रियेसाठी थोडया प्रमाणात व्यत्यय निर्माण करत आहेत. दरवर्षीच जिल्हयात मोठा पाऊस झाल्याने कित्येक गावांचा संपर्क तुटतो. पण आज मोठया प्रमाणात पुलांचे बांधकाम झाल्याने ती संख्या कमी झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने वन संपत्ती ही महत्त्वाची आहे, निसर्ग अबाधीत राखण्यासाठी वन विभाग इतर विकास कामांवर बंधने टाकत असतो. यातून मार्ग काढत आता रस्ते, जलयुक्त शिवर कामे यातून विकासाला गती मिळत आहे. दुर्गम भागात वीज, दुरध्वनी सेवा सुरू झाल्याने तोही भाग जगाशी जोडला जात आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात एकाच वर्षात सर्व सुखांची प्राप्ती होत नाही. त्याच प्रकारे आदिवासी व नक्षल प्रभावी जिल्हयात सर्वच विकास कामे लगेच पुर्ण होतील याची आपेक्षा करणे चुकीचे होवून बसेल. मागील काही वर्षात जिल्हयात झालेले अनेक कामे अधोरेखित करणे याठिाकणी गरजेचे आहे. आदिवासी पाड्यांमध्ये कुपोषण निर्मुलन व सकस अन्न उपलब्ध करण्यासाठी शासन काम करत आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानबाबतून सर्व पात्र लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट करण्याकरिता अभियान राबविण्यात येत आहे. 100 टक्के शिक्षापत्रिका व धान्य वाटप तसेच प्रत्येक कुटुंबास 100 टक्के गॅस कनेक्शन वाटपाबाबतचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. गेल्या वर्षीपासून जुलै अखेर खरीप हंगामाचे 12.54 लक्ष तर रब्बी हंगामाचे 2.21 लक्ष क्विंटल असे मिळून 14.75 लक्ष क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या प्रक्रियेत 2 अब्ज 32 हजार रूपये प्रत्यक्ष शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. ही जिल्हयातील विक्रमी धान खरेदी होती. यातून आधुनिक शेती व त्यातून शेतक-यांचे वाढलेले उत्पन्न लक्षात येईल.

जून 2018 मध्ये शासनाकडून ॲनिमिया निर्मुलनासाठी पोषणयुक्त तांदूळ वाटप करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर एका वर्षासाठी भामरागड व कुरखेडा तालुक्यात याची अंमलबजावणी सुरू आहे. आता यावर्षी संपुर्ण जिल्हयात ही पोषणयुक्त तांदूळ वाटप योजना राबविली जाणार आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्ह्यातील एकूण 457 ग्रामपंचायती पैंकी 455 ग्रामपंचायतीमध्ये मनरेगाची कामे घेतलेली आहेत. राज्यात यात गडचिरोली जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. यातून लोकांची मानसिकता विकासात्मक असल्याचे स्पष्ट होत आहे.

महिला सक्षमीकरणाकरीता 2278 स्वयं सहायता महिला बचत गटांची निर्मिती जिल्हयात माविमच्या मदतीने झाली आहे. यावरून गडचिरोलीमधील विकासातील महिलांचा वाटा अधोरेखित करता येईल. जिल्ह्यातील माविमच्या बचत गटातील एकूण 9012 महिला सामुहिक तथा वैयक्तिक उद्योग व्यवसाय करीत आहेत. नामांकित शाळांमधून शिक्षण या योजनेतून आदिवासी बहुल जिल्हयातील आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदत होत आहे. आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेत कमी राहणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमधून शिक्षण देण्यास आदिवासी विकास विभागाने सुरुवात केली आहे. या विद्यार्थ्यांमधून उत्तम अधिकारी घडावेत यासाठी लवकरच जिल्हयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचीही व्यवस्था शासन करणार आहे.

शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी सद्या 245 स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना, 4 प्रादेशिक व वाडी-वस्त्यांसाठी 498 दुहेरी पंप नळ पाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत. मुख्यमंत्री पेयजल मधून 17 कामे प्रगतीपथावर तर नव्याने दुहेरी पंप योजना  60 ला मान्यता देण्यात आली आहे. स्वजल योजनेत आता जिल्हयाचा समावेश केला असून हर घर जल ही संकल्पना 15 गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वच्छतेसाठी सुरू केलेली योजना यामध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गडचिरोली 2018 साली संपुर्ण हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. आता यांनतर नव्याने वाढलेल्या उर्वरीत 26हजार कुटुंबांचे शौचालय बांधकाम पुर्ण करण्याचे काम सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणातून पुढे जाण्यासाठी सांडपाणी, घनकचरा व प्लास्टीक बंदी याबाबतची कामे गतीने सुरू आहेत.

भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतून अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार दिला जातोय. आज जिल्ह्यात 12 हजार चारशे गरोदर व स्तनदा महिला लाभ घेत आहेत. 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 65 हजार मुलांनाही सकस आहार पुरविला जात आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 35400 लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वाटप केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने मधून 8045 लाभार्थ्यांना मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  जिल्हयातील मातामृत्यू, बालमृत्यू टाळण्याकरिता तपासणी, लसीकरण, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

शिक्षण क्षेत्रातील विचार करता जिल्ह्यात 1538 प्राथमिक शाळा असून त्यामध्ये फक्त मुलींसाठी 20 प्राथमिक व 10 माध्यमिक शाळा आहेत. नगरपरिषदेच्या 19 शाळा आहेत. तसेच केंद्रपुरस्कृत धानोरा, आहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा येथे कस्तुरबा गांधी विद्यालय आहेत. घोट येथे जवाहर नवोदय विद्यालय आहे. तर खासगी व्यवस्थापनाच्या ३५ अनुदानित प्राथमिक शाळा, ५२ कायम विनाअनुदानित शाळा आहेत. तसेच २२५ माध्यमिक शाळा आहेत. नुकतीच केंद्रीय विद्यालयाला गडचिरोली येथील नवेगाव येथे शासनाकडून जागा उपलब्ध झाली आहे. तसेच आदिवासी युवकांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देवून रोजगारभिमुख कौशल्यांचा विकास करणेसाठी विविध प्रशिक्षणांमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

अशाच प्रकारे महाराष्ट्र शासन गडचिरोली जिल्हयाच्या शाश्वत विकासाच्या अंमलबजावणीसाठी असंख्य योजनेद्वारे कार्य करत आहे. गडचिरोली मधील लोकांची बदललेली मानसिकता, शासनाचे प्रयत्न, आधुनिक शेती, चांगल्या आरोग्याच्या सुविधा तसेच शिक्षण क्षेत्रातील स्थानिक विद्यार्थ्यांची झेप अशा नव्या विषयांवर गडचिरोली बद्दल सर्वदुर चांगल्या विषयांवर संदेश पोहचविण्यास शासन व एकुणच सर्व माध्यमे कटीबद्ध आहोत. गडचिरोली वर्धापन दिनानिमित्त सर्व बांधवाना खुप खुप शुभेच्छा.