२0८२ गरजूंनी घेतला ‘जीवनदायी’चा लाभ

0
14

गोंदिया : दारिद्र्य रेषेखालील व गरजू नागरिकांना मोफत औषधोपचार, गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रिया व आरोग्यविषयक सुविधा देण्याच्या उद्देशाने सन २०१३ मध्ये राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मार्च २०१५ पर्यंत २०८२ रुग्णांनी उपचार करवून घेतले आहेत.
दारिद्र्य रेषेखालील पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पात्र कुटुंबांना प्रतीवर्ष शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी १ लाख ५० हजार रुपयापर्यंत विमा संरक्षण देण्यात येते.
जिल्ह्यात या योजनेचा लाभ कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, सेंट्रल रुग्णालय, गोंदिया केअर रुग्णालय व न्यू गोंदिया रुग्णालय येथे देण्यात येत असून यामध्ये ९७१ वेगवेगळ्या व गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रिया व उपचाराचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मार्च २०१५ पर्यंत २०८२ गरजुंनी या योजनेचा लाभ घेतला असून ५०० रुग्णांनी मेडिकल ओन्कोलॉजी, २६८ किडनी विकास, १६१ सर्जीकल, १५९ रेडिएशन, ११६ स्त्रीरोग व प्रसुती शस्त्रक्रिया, १३९ जनरल सर्जरी, ११० कार्डियाक सर्जरी उपचारांचा व इतर आजाराबाबतही नागरिकांनी लाभ घेतला.
या योजनेतील उपचार पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्यांना आपातकालीन परिस्थितीत रोग व उपचार प्राप्त होतात. सर्व उपचार व परिक्षण पुराव्यावर आधारित आहेत.
लाभार्थ्यांना रुग्णालयात मदत व सहाय्य होण्याच्या उद्देशाने आरोग्यमित्रांची व जिल्हा व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेवून निरोगी व निरामय जीवन जगावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर व जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे.