देशात भारी, जिल्हा परिषद कोल्हापुरी…

0
14

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यातील विकासाच्या योजना पंचायत राज संस्थांमार्फतच राबवल्या जातात. काही पंचायत राज संस्था मात्र यापुढेही जाऊन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आखतात आणि यशस्वीपणे राबवतात. कोल्हापूर जिल्हा परिषद ही त्यापैकीच एक. हे सांगण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या राजीव गांधी पंचायत राज सबलीकरण आणि उत्तरदायित्त्व प्रोत्साहन योजना अभियानात कोल्हापूर जिल्हा परिषदेने राष्ट्रीय स्तरावर पटकावलेला प्रथम क्रमांक. नवी दिल्लीमध्ये 24 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 30 लाख रुपयांचे बक्षीस देऊन हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने राबवलेले आरोग्य विभागाचे कायापालट अभियान, प्राथमिक शिक्षणांतर्गत 169 शाळांमध्ये एबीएल (ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग) प्रकल्प, अंगणवाडीतील बालकांसाठी कुपोषणमुक्ती अभियान, गतिमंद मुलांसाठी डे केअर सेंटर असे कितीतरी उपक्रम आहेत. महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायत राज सबलीकरण आणि उत्तरदायित्त्व प्रोत्साहन योजना अभियानामध्ये या जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावत 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळवले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात खोवलेला आणखी एक रत्नजडीत तुरा.

जनसहकार्यातून कोल्हापूर जिल्हा परिषदेने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, ही उक्ती साध्य केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी आणि हट के अंमलबजावणी करत कोल्हापूर जिल्हा परिषदेने महिला, बेरोजगार, लहान मुले, निराधार अशा समाजातील सर्व व्यक्तिंचा विकास करण्याचा ध्यास आणि शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, निवारा, पोषण अशी प्रत्येक गरज पूर्ण करण्याचा वसा घेतला आहे.

निर्मलग्राम स्पर्धेत राज्यात एकूण 11 पंचायत समिती निर्मलग्राम झाल्या असून त्यातील 6 पंचायत समिती एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 1029 पैकी 1002 ग्रामपंचायती निर्मलग्राम झाल्या आहेत. हे प्रमाण 97.38 टक्के इतके आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महिन्याच्या पहिल्या शनिवारी कार्यालयांतर्गत आणि तिसऱ्या शनिवारी कार्यालय परिसर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तसेच 100 टक्के शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छता व सौंदर्यीकरण अभियान म्हणजेच कायापालट अभियानांतर्गत तब्बल सव्वाकोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. जिल्ह्यातील 73 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 413 आरोग्य उपकेंद्रांचा विकास करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रातील प्रसूति विभाग, रुग्णांचा प्रतिक्षा कक्ष, औषध भांडार गार्डन आणि इमारतीची रंगरंगोटी अशी विविध कामे या कायापालट अंतर्गत करण्यात आली आहेत. हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरला.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून पन्हाळा, गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी तलावातील गाळ काढण्यात आला. तसेच वनराई बंधारे बांधण्यात आले. 29 गावांतील जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलून गणेशमूर्तींचे दान, घनकचरा व्यवस्थापन मानवी अस्थींचे विसर्जन शेतामध्ये करण्यासाठी रॅली व अन्य माध्यमांतून जनजागृती केली.

महिला सक्षमीकरणात झेप घेताना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारासाठी जिल्ह्यातील आयेशा स्वयंसहायता गटाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवत राज्यपालांच्या हस्ते अभिमानाने पुरस्कार स्वीकारला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने फेब्रुवारी 2015 मध्ये विभागीय ताराराणी महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. या महोत्सवात 65.42 लाख रुपयांची उलाढाल झाली.

सन 2013-14 मध्ये कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) राज्यात अव्वल ठरली. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत डीआरडीएने 18002331215 हा टोल क्रमांक उपलब्ध करून दिला. तर महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र www.mahilasakshamikarankop.com हे संकेतस्थळ विकसित केले. स्वयंसहायता गटांच्या उत्पादनासाठी स्वतंत्र ताराराणी ब्रँडची नोंदणी केली. स्वयंसहायता गटाच्या महिलांना शाळा गणवेश शिलाईचे प्रशिक्षण दिले. एक कुटुंब एक नोकरी अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील 2200 युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये एक दिवस शाळेसाठी अर्थात प्रेरणा दिन अभियान राबवण्यात आले. महसूल विभाग व जिल्हा परिषदेचा अधिकारी व पदाधिकारी यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात आले. अधिकाऱ्यांनी मी कसा घडलो याविषयी विद्यार्थ्यांशी हितगुज आणि शाळेतच माध्यान्ह भोजन या माध्यमातून नकळतपणे मुलांना यातून प्रेरणा मिळत गेली.

देशात प्रथमच निवासी क्रीडा प्रशाला सुरु करण्याचा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेने राबवत शिंगणापूर येथे राजर्षि शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला दोन वर्षापूर्वी सुरु केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतील क्रीडानैपुण्य शोधण्यासाठीच ही शाळा सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून चालविली जाणारी ही देशातील एकमेव शाळा आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

उद्याची पिढी संगणकसाक्षर असावी, यासाठी 195 शाळांमध्ये ई लर्निंग स्कूल्सची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील एकूण 2005 जिल्हा परिषद शाळांपैकी 1105 शाळांमध्ये संगणक, 162 शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा आहेत. जिल्ह्यात 7310 शिक्षक तर 80 हजार विद्यार्थी संगणकसाक्षर आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढावी यासाठी 246 शाळांमध्ये लोकसहभागातून गंमत-जंमत वर्गखोली तयार करण्यात आली. त्यामध्ये प्राणी, पक्षी, व्यंगचित्रे रेखाटण्यात आली. जागतिक कीर्तीचे गणिती भास्कराचार्य 2 यांच्या नवव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात गणित परिषद आयोजित करण्यात आली होती. आरोग्यसंपन्न शाळा हा उपक्रमही राबवण्यात आला.

जिल्ह्यातील लोकसहभागातूनच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मेंदू पक्षाघात, गतिमंद आणि बहुविकलांग मुलांसाठी डे केअर सेंटर सुरु करण्यात आली आहेत. प्रत्येक सेंटरवर किमान 25 विद्यार्थी असे जिल्ह्यात सुमारे 2 हजार, 450 विद्यार्थ्यांना या सेंटरमध्ये शिकविले जात आहे.

कुपोषण रोखण्यासाठी पोषण आहार दिल्यामुळे जिल्ह्यात कुपोषित बालकांचे जुलै 2014 मध्ये असणाऱ्या 0.59 टक्के प्रमाणावरून फेब्रुवारी 2015 मध्ये 0.40 टक्के प्रमाण अशी घट करण्यात यश आले. याशिवाय पंचायत समिती गडहिंग्लजची तीन मजली प्रशासकीय इमारत व अधिकाऱ्यांचे दुमजली निवासस्थान, कोल्हापूर आणि कुरूंदवाड येथील व्यापारी संकुल (कमर्शियल कॉम्प्लेक्स), लेक वाचवा अंतर्गत लक्ष्मी आली घरा, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम असे अनेक उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेने यशस्वीरीत्या राबवले.

या सर्व उपक्रमांमुळे कोल्हापूर जिल्हा परिषद इतरांपेक्षा सरस ठरली नसती तरच नवल. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन व सध्याचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या वेगळ्या दृष्टीला या पुरस्काराच्या रुपाने मिळालेली मोहोर जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे कर्तृत्त्व उजळून टाकणारी आहे.

-संप्रदा द. बीडकर
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर(साभार महान्युज)