शिवणी ग्रामपंचायतीला केंद्राचा पुरस्कार

0
8

भंडारा : पंचायत राजच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा पालटविलेल्या जिल्ह्यातील शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीचा शुक्रवारी दिल्लीत पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सरपंच व सचिवांची पाट थोपटून गावाला प्रगतिपथावर नेण्याचा सल्ला दिला.
जिल्ह्यातील लाखनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीने शासनाच्या सर्व योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळावा, यादृष्टिने उल्लेखनीय काम केले आहे. गाव विकासासाठी सरपंच पद्माकर बावणकर व सचिव जयंत गडपायले यांनी ग्रामपंचायतीच्या सव सदस्यांना विश्वासात घेऊन कामे केली आहेत. ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाने विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
सन २०१३-१४ मध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने शिवणीला केंद्रीय पुरस्कार मिळण्याच्या दृष्टिने प्रस्ताव पाठविला होता. याची दखल घेऊन केंद्रीय समितीने गावाची पाहणी केली व यात ते समाधानी आढळल्याने त्यांनी ग्रामपंचायतीला राजीव गांधी पंचायत राज सशस्क्तीकरण पुरस्कार मिळावा यासाठी प्रस्ताव केंद्राकडे सादर केला. याअनुषंगाने, ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली.
शुक्रवारी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या एका समारंभात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री बिरेंद्र सिंह, केंद्रीय राज्यमंत्री निहाल चंद यांच्या हस्ते देशातील २०३ ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कारासाठी राज्यातील १६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात नागपूर विभागातून तीन ज्यात भंडारा जिल्ह्यातून शिवणी (मोगरा) ही एकमेव ग्रामपंचायत ठरली.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे सरपंच पद्माकर बावणकर व सचिव जयंत गडपायले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.