नवनिर्वाचित आमदार सुमन पाटील, तृप्ती सावंत यांचा शपथविधी

0
29

मुंबई-नवनिर्वाचित विधानसभा सदस्य सुमन आर. आर. पाटील व तृप्ती प्रकाश (बाळा) सावंत यांनी आज विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या शपथविधी कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान परिषदेचे सदस्य सुनील तटकरे, अनिल परब, सदस्य नीलम गोर्‍हे, विधानसभेचे माजी सदस्य नबाब मलिक, विजयराज शिंदे तसेच विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विधानसभा सदस्य आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील निवडून आल्या आहेत. तसेच विधानसभा सदस्य प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत निवडून आल्या. नवनिर्वाचित दोन्ही सदस्यांना विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शपथ दिली.