वर्धेतील कंत्राटदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
18

वर्धा,दि.२-विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांचे देयक बांधकाम पूर्ण होऊनही मिळत नसल्याने नपतील दोन कंत्राटदारांनी नगराध्यक्ष व वर्धा नगर परिषद प्रशासनाच्या सुस्त कारभाराच्या विरोधात एल्गार पुकारत शनिवारी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. सदर घटना पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी केरोसिनने भिजलेल्या दोन्ही कंत्राटदारांना तत्काळ ताब्यात घेतले.
विविध योजनेअंतर्गत विकासकामे करण्यात आली. परंतु, त्या बांधकामाच्या फाईलवर नगराध्यक्षांनी हेतुपुरस्सर स्वाक्षरी केली नाही. ती देयके तत्काळ मिळावी, याकरिता वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, नगराध्यक्षांचा मनमानी व स्थानिक नगर परिषदेतील सुस्त कारभारामुळे सदर बांधकामाची देयके अद्यापही मिळालेली नाही. कंत्राटदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्धा नगर परिषदेतील अभियंता अतुल पाटील आणि नगराध्यक्षाचे पुत्र प्रशांत कुत्तरमारे यांच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणाचा सूड उगविण्याकरिता आम्ही शहरात विविध ठिकाणी केलेल्या बांधकामाच्या देयकांच्या फाईलवर नगराध्यक्षांकडून दोन-दोन महिने स्वाक्षरी केली जात नाही. अनेक बांधकामे पूर्ण होऊन वर्ष लोटले असून नगराध्यक्षांनी अद्यापही स्वाक्षरी केली नसल्याने फाईल नगराध्यक्षांच्या घरी धूळखात आहे, असा आरोप नप कंत्राटदार महम्मद जाकीर महम्मद जलील व पी. एच. पांडे यांनी करीत सदर बांधकामांचे देयक तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी वर्धा नगर परिषद कार्यालय परिसरात अंगावर केरोसिन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सदर बाब लक्षात येताच पोलिस कर्मचारी भगवान बावने, देवराव येनकर, जयेश डांगे, अनिल वैद्य, राजू शंकभर यांनी त्यांच्या हातातील केरोसिनची शिशी हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संतप्त जमावाने नप मुख्याधिकार्‍यांचे दालन गाठले. नगराध्यक्षांच्या मनमानी करभारामुळे नपतील कंत्राटदार आत्मदहन करण्यास प्रवृत्त होत असून आपण काय करत आहात, अशी विचारणा करीत संतप्त जमावाने मुख्याधिकारी हरीशचंद्र टाकरखेडे यांना चांगलेच धारेवर धरले.