पिकांची उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे- राजकुमार बडोले

0
20

गोंदिया ,दि.२-: धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. त्यांना नगदी पिकांकडे वळविणे आवश्यक असून नगदी पिकांसह धानाची उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत श्री. बडोले बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील आदी उपस्थित होते.
श्री.बडोले म्हणाले, रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने लक्ष द्यावे. रब्बीमध्ये केवळ धान पिक न घेता भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. पॉली हाऊस, शेड नेटमध्ये शेतकऱ्यांनी शेती करावी. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. जलसाक्षरतेच्या दृष्टीने शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळला पाहिजे. रेशीम किड्यांचे संगोपन करुन टसर रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा.
शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचे परिक्षण करण्यात यावे, असे सांगून श्री. बडोले म्हणाले, प्रत्येक तालुक्यात आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन कोणत्या प्रकारची पिके घेता येतील त्यादृष्टीने नियोजन करावे. येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी, आमदार आणि जिल्हयात कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन जिल्हयातील कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्याचा विचार आहे.
जमिनीचा पोत दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या व किटकनाशकांच्या अतिवापरामुळे घसरत आहे. शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. रब्बी पिकाच्या काळात कृषी पंपांना पुरेसा व व्यवस्थित वीज पुरवठा करण्यात यावा. वीज वितरण कंपनीने यासाठी फिडरनिहाय नियोजन करावे. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना वेळीच पीककर्ज पुरवठा करावा, असेही निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
आमदार श्री. रहांगडाले म्हणाले, कृषि विभागाने कृषी चिकित्सालयात भाजीपाला पिकाची लागवड करुन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटीसाठी आमंत्रित करावे. त्यामुळे शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने भाजीपाला शेती करता येईल. जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले, शेतकरी फुलबाग, फळबाग शेतीकडे वळविण्यासाठी नियोजन करण्यात येईल. राष्ट्रीयकृत बँकानी शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा वेळीच करावा याबाबत बँक प्रतिनिधींची सभा घेणार आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुरील यांनी खरीप हंगामाची माहिती दिली.सूत्रसंचालन कृषी उपसंचालक अश्विनी भोपळे यांनी केले. आभार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मानले.