चंद्रपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

0
10

संगणकात अचूक नोंद : दैनंदिन जमाखर्चाच्या नोंदी
चंद्रपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतींच्या दैनंदिन जमा खर्चाच्या नोंदी ‘प्रियसॉफ्ट’ या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमध्ये सन २0११-१२ या आर्थिक वर्षात सवरेत्कृष्टरीत्या नोंदविल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागास देश पातळीवर सन्मान प्राप्त झाला आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत चंद्रपूर जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत स्तरावरील जमा व खर्चाचे लेखे ‘आदर्श लेखांकन पद्धती’ प्रियासॉफ्ट या वेब बेस ऑनलाईन संगणकीय आज्ञावलीमध्ये अद्ययावत नोंदी घेणे महाराष्ट्र शासनाने बंधनकारक केले आहे. भारताचे नियंत्रक व महालेखाकार, दिल्ली यांनी सदर आज्ञावली तयार केली असून सर्व राज्यात या आज्ञावलीमध्ये पंचायत राज संस्थाचे लेखे ठेवणे बंधनकारक केले आहे.
१ मे महाराष्ट्र दिनी शासकीय कार्यक्रमात राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांना सदर पारितोषिक प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व एक लाख रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे वित्त समिती सभापती ईश्‍वर मेश्राम, बांधकाम समिती सभापती देवराव भोंगळे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी सदाशिव शेळके आदी उपस्थित होते.
प्रिया सॉफ्ट या संगणकीय आज्ञावलीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीचे अचूकपणे लेखे नोंदविण्यास्तव जिल्हा परिषद येथील लेखा विभागात कार्यरत कनिष्ठ सहायक (लेखा) संजय डांगे यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. या उपक्रमामध्ये त्यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे त्यांच्या पुरस्काराची शिफारस जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती.