कामकाजावर सीसीटीव्हीतून ‘वॉच’

0
14

गोंदिया : नवीनवीन प्रयोग यशस्वीरित्या राबविल्याने जिल्ह्यात अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून हटके असलेल्या कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्राने आणखी एक नवा प्रयोग केंद्रात राबविला आहे. केंद्रातील दैनंदिन कामकाज व्यवस्थितपणे व्हावे यासाठी आता सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्याद्वारे ‘वॉच’ ठेवले जात आहे.
ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वीज व पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. शिवाय महिलांची प्रसूती आरोग्य केंद्रातच व्हावी यासाठी शासनाचे आग्रह आहे. यासाठीच लाखो रूपयांचे अनुदान देऊन माता व बाल मृत्यू होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. तसेच इतर रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी निधी देण्यात येते. यासाठी शासनाकडून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सारखाच निधी देते परंतु गोंदिया जिल्ह्यातील ४0 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी फक्त कावराबांध याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रगती समोर येते.
सर्व आरोग्य केंद्रांना मार्गदर्शन करणारे अधिकारी तेच, मिळणारे अनुदान सारखे, शासनाचे नियम सर्वांसाठी सारखे मात्र कावराबांध आरोग्य केंद्रात सर्वच सोयी सुविधा उपलब्ध असतात. अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात तशा सुविधा का होत नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आदिवासी नक्षलग्रस्त भागात असलेल्या कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या प्रगतीमुळे त्या आरोग्य केंद्राला आदर्श हे नाव देण्यात आले.
तेथील डॉ.विवेक अनंतवार व त्यांच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी केलेल्या अंगमेहनतीमुळे या आरोग्य केंद्राचे नाव राज्यस्तरावर गेले आहे. या आरोग्य केंद्रातील सर्व हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी तसेच रूग्णांशी हेळसांड करण्याचा प्रकार होऊ नये, असामाजिक तत्वांचा वावर असू नये, कर्मचार्‍यांनी कामात लक्ष न घालता इकडे तिकडे फिरू नये तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य केंद्रातील बाळ चोरीला जाऊ नये या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी कावराबांध आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्रात चार ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले असून मॉनिटर डॉक्टरांच्या कक्षात ठेवण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रापासून इतर आरोग्य केंद्रानी आदर्श घेण्याची गरज आहे.