मोदींचे आश्‍वासन निवडणुकीपुरतेच- गोपालदास अग्रवाल

0
9

गोंदिया : केंद्र व राज्यात काँग्रेसची सत्ता असताना क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही भरपूर निधीची व्यवस्था केली. मात्र आता भाजपच्या शासनात संपूर्ण प्रशासनच ठप्प पडले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आश्‍वासने निवडणुकीपुरतीच ठरली. ‘अच्छे दिन’च्या नावावर आता देशवासीयांसाठी ‘बुरे दिन’ आले आहेत, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुका काँग्रेस कमिटीद्वारे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व काँग्रेस कार्यकर्ता संमेलन अग्रसेन सभागृहात पार पडला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागात अनेक कार्य पार पडले. तर नवीन भाजप शासनाच्या इशार्‍यावर २५१५ योजनेचे मंजूर कार्य रद्द करण्यात आले. बीआरजीएफ योजनेचा निधी काँग्रेसच्या काळात दरवर्षी ग्रामपंचायतींना दिला जात होता. मात्र आता भाजप शासनात वर्षभरापासून निधी अप्राप्त आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गावोगावी पायी फिरत ग्रामीण जनता व शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेत आहेत, तर प्रधानमंत्री मोदींना विदेशी दौर्‍यांपासून सवड मिळत नाही. हे येणार्‍या वादळाचे संकेत असून भाजप शासनाविरूद्ध आता जनाक्रोष वाढत आहे. राज्यात एक हजार ८00 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली तर विदर्भातील ६00 शेतकर्‍यांनी आपली जीवनलीला संपविली. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात सुयोग्य काँग्रेस उमेदवारांना निवडून देत जनतेने परिश्रम केले. आता जि.प. निवडणुकीत काँग्रेच्या तिकिटावर लढणार्‍या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे, तेव्हाच क्षेत्राचा विकास होवू शकेल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी हिवरा व घिवारी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा व चुलोद सहकारी संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार आ. गोपालदास अग्रवाल, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे व काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी भूविकास बँकेचे माजी प्रशासक धनंजय तुरकर, माजी उपसभापती मनिष मेश्राम, माजी सरपंच अशोक लिचडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी सडक-अर्जुनी सहकार क्षेत्राचे युवा नेता ओमकार पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रास्ताविक व स्वागत समारंभ प्रकाश रहमतकर तर संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. याप्रसंगी रजनी नागपुरे, पृथ्वीपालसिंग गुलाटी, अशोक लंजे, धनलाल ठाकरे, पं.स. सभापती कौशल्या बोपचे, उपसभापती चमन बिसेन, जि.प. सदस्य रमेशकुमार लिल्हारे आदी उपस्थित होते.