वीसपेक्षा कमी पटाच्या शाळांना अभय

0
19

मुंबई – वर्गाचा पट 20 पेक्षा कमी असणाऱ्या शाळा बंद पडू देणार नाही, असे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला दिले आहे. परिषदेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. 5) तावडे यांची भेट घेतली; त्या वेळी ते बोलत होते.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, जुन्या निकषांप्रमाणे 2013-14 ची संचमान्यता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजना, पायाभूतपेक्षा अधिक वाढीव पदांना मान्यता, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍त्या आणि आवश्‍यक तेथे शिक्षकभरती या मुद्द्यांवर संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन तावडे यांनी दिले. शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे राज्य सदस्य सुधीर घागस, ज्ञानेश्‍वर गोसावी, अनिल बोरनारे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध माध्यमिक शाळा संहितेप्रमाणे, चिपळूणकर अहवालाप्रमाणे, 25 नोव्हेंबर 2005 च्या सरकारी निर्णयानुसार, की 23 ऑक्‍टोबर 2013 च्या निर्णयानुसार मान्य करावा, याबाबत सरकारने प्रचंड घोळ घातला आहे. राज्य सरकारच्या 23 ऑक्‍टोबर 2013 च्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या गोंधळात भर पडली आहे. त्यामुळे एकही कर्मचारी अतिरिक्त होणार नाही, ही भूमिका घेऊन आकृतिबंध मंजूर करण्यात येईल, असे तावडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.