नांदगावपेठच्या धर्तीवर आठ जिल्ह्यात एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारणार – मुख्यमंत्री

0
8

अमरावती ता.२१-:: राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या आठ जिल्ह्यात नांदगावपेठच्या धर्तीवर एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार आहे. शिवाय स्थानिक खाजगी उद्योजकांना अर्थसहाय्य करून प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली.
नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत वस्त्रोद्योग उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, रवि राणा, रमेश बुंदिले, डॉ.अनिल बोंडे, आमदार यशोमती ठाकूर, वस्त्रोद्योग विभागाचे अपर सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आदीं उपस्थित होते.
कापूस पिकविणाऱ्या भागातच प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजेत, हे शासनाचे धोरण असून याची सुरूवात अमरावतीपासून झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत उद्योग विभागाने वस्त्रोद्योग उद्यानासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उत्तम पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. हे मॉडेल देशात सर्वोत्तम ठरणार असून यांचे अनुकरण इतर राज्यही करतील. कापसावर आधारित उद्योग सुरू झाले तर स्थानिक लोकांना रोजगारासोबत कापसाला चांगला भाव मिळेल.

नांदगावपेठच्या धर्तीवर यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यालाही वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येईल. ज्या भागात कापसाचे अधिक उत्पादन होते. त्याच भागात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाबरोबरच सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे या बाबीला विशेष प्राधान्य देण्यात आले असून जलयुक्त शिवार अभियान हा त्याचाच एक भाग आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.‘ॲडव्हांटेज विदर्भ’च्या वेळी ज्या उद्योजकांनी सामंजस्य करार केला आहे. ते उद्योग विदर्भात सुरू झाले नसतील त्यांची अडचण समजून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाला केले.