गौतम अदानींच्या संपत्तीत ४८ टक्क्यांची वाढ

0
16

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.३१-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकदम खासम् खास मानले जाणारे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात तब्बल ४८ टक्क्यांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आजघडीला ते ८.१ अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे ५१,६०० कोटी रुपयांचे धनी आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या वर्षपूर्तीपाठोपाठ, अदानींचं वर्षाचं ‘प्रगतीपुस्तक’ उघड झाल्यानं राजकीय आणि उद्योगविश्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘ब्लूमबर्ग’ या अर्थविषयक नियतकालिकेने अब्जाधीशांच्या यादीत भारतातील सात उद्योगपतींना स्थान दिलंय. त्यापैकी, अदानींच्या निव्वळ मालमत्तेत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांनी सन फार्माचे दिलीप संघवी, एचसीएलचे शिव नाडर, आर्सेलर मित्तलचे प्रमुख एल एन मित्तल आणि विप्रोचे अजीम प्रेमजी यांना मागे टाकलं आहे. ट्रेडिंग, ऊर्जा, बंदरं आणि खाद्य तेल क्षेत्रातील त्यांच्या कंपन्याच्या समभागांनी उसळी घेतल्यानं त्यांनी जवळपास ३ अब्ज डॉलर, म्हणजेच १९ हजार कोटी रुपयांची कमाई केल्याचं कळतं. गेल्या वर्षभरापासून अदानी वेगवेगळ्या मालमत्ता खरेदी करत आहेत. टाटा समूहाकडून त्यांनी धमरा बंदर ९०० दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच ५,७०० कोटी रुपयांना विकत घेतलं. लांको इन्फ्राटेकचा उडुपी इथला ऊर्जा प्रकल्पासाठी १ अब्ज डॉलर, अर्थात ६,३०० कोटी रुपये देण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.