मुंबईच्या पर्यावरणपूरक विकासासाठी महाराष्ट्र-नेदरलँण्डस्‌मध्ये सामंजस्य करार – मुख्यमंत्री

0
9

मुंबई दि. ६ : मुंबईतील पायाभूत सुविधांचा पर्यावरणपूरक विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि नेदरलँण्डस्‌ यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या करारानंतर हॉटेल ताज येथे नेदरलँण्डस्‌चे पंतप्रधान मार्क रुटा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या सामंजस्य कराराविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या कारारान्वये मुंबईतील सागरी किनारा मार्ग आणि मेट्रो या प्रकल्पांमध्ये संयुक्त जोडणी करण्याबाबत राज्याला नेदरलँण्डस्‌कडून तांत्रिक सल्ला देण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजनासाठी गेल्या महिन्यात दोन डच तंत्रज्ञांनी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॅार्पोरेशन यांच्याकडून समजावून घेतले आहे. या करारामुळे मेट्रो तसेच समुद्र किनारा मार्ग (कोस्टल रोड) यासारखे मोठे प्रकल्प नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविणे शक्य होणार आहे.

विशेषत: या प्रकल्पांचा आराखडा तसेच सुविधांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामध्ये क्षमता बांधणी करणे सोपे होईल. याशिवाय पूरनियंत्रण, जल व्यवस्थापन, सागरी किनारे यामध्ये एकात्मिक पद्धतीने चांगल्या सुविधा उभारता येतील. स्थानिक संस्थाच्या मदतीने या प्रकल्पांचे पर्यावरण आणि सामाजिक परिणाम तपासणारी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. डच सरकारतर्फे येत्या काही दिवसात आणखी दोन तज्‍ज्ञ व्यक्ती भेट देऊन स्थानिक प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. जल व्यवस्थापनातील आणखी एक जलतज्ज्ञ हेन्क ओविन्क हे देखील महाराष्ट्रात येणार आहेत. जल व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचे आराखडे तयार करणे याबाबतीतले प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथून नेदरलँण्डस्‌ येथे काही तज्ज्ञ अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.