रचना गहाणे अध्यक्ष, अमित बुद्धे उपाध्यक्ष, श्रीमती पुराम महिला बाल कल्याण सभापती?

0
15

गोंदिया,दि. २९– जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या येत्या ३० तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. परंतु जिल्हा परिषदेची सत्ता आपल्यालाच मिळेल आणि आपले पदाधिकारी कोण राहणार, यावर चर्चां करून भाजपने नाव सुद्धा पक्के केल्याची चर्चा बाहेर आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार सिताबाई रहांगडाले यांना रचना गहाणे व सविता पुराम यांच्यासाठी ज्याप्रमाणे मतदार संघाची सोय करण्यात आली, तशी सोय न करता डावलून तुम्ही अध्यक्ष पदाच्या दावेदारीतून बाहेर असा इंगा दाखविला.त्यामुळे की काय मुख्यमंत्र्यांची जिल्हास्तरीय जाहीर सभा असताना व महिला अध्यक्ष असतानाही सिताबाई रहांगडाले मात्र मंचावरून गायब होत्या. यावरून त्या किती नाराज आहेत, हे स्पष्ट होते. तरी पक्षाला मात्र त्याच्याशी काही देणे-घेणे नाही.
तर मागच्या निवडणुकीत पार्सल म्हणून गोठणगाव येथूनच पराभूत झालेल्या रचना गहाणे या मूळच्या बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्रातील. परंतु, पक्षाच्या वरिष्ठांची मर्जी ऐवढी चांगली की त्यांना पुन्हा गोठणगावला पार्सल उमेदवार म्हणून तर पाठविलेच. जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्ष म्हणून ही त्यांच्या नावाची चर्चा करून ओबीसी प्रवर्गातून संभाव्य इतर गटातून निवडून येणाऱ्या महिला उमेदवारांवर एकप्रकारे अन्यायच केला आहे.
तर गेल्या निवडणुकीत माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे यांच्या विरोधात दंड थोपटून विरोधात काम करणारे व शिवसेनेकडून कटरेंच्या पराभवासाठी रिंगणात राहिलेले अमित बुद्धे आसोली मतदार संघातून भाजपचे उमेदवार आहेत. भाजपने त्यांनाही संभाव्य उपाध्यक्षपद बहाल केल्याची चर्चा आहे. तर पुराडा मतदार संघातून भर्रेगाव मतदार संघात गेलेल्या आमदार पत्नी सविता पुराम यांना पुन्हा महिला बाल कल्याण सभापती पद तर इटखेडा मतदार संघातून माहुरकुडा मतदार संघात उडी घेतलेले उमांकांत ढेंगे हे अर्थ व बांधकाम सभापती राहणार असल्याची चर्चा आहे.