८१ वर्षाच्या वृद्धेला गाईने दिले जीवनदान

0
15

चेन्नई – चेन्नईच्या ८१ वर्षीय वृद्धेला गायीमुळे जीवनदान मिळाले आहे. यावृद्धेला गायीच्या ह्रदयापासून तयार केलेले हार्ट व्हॉल्व बसविण्यात आले. या महिलेची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या या यशस्वी शस्त्रक्रियेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
चेन्नईतील ८१ वर्षीय महिलेच्या ह्रदयावर ११ वर्षांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. या महिलेला चेन्नईतील लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ११ वर्षांपूर्वी महिलेच्या ह्रदयाला जोडलेला एरोटिक व्हॉल्व पुन्हा एकदा संकुचित झाला होता. याच महिलेला काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरही झाला होता व त्यावेळी वृद्धेवर केमोथिरपीही झाली होती. अशी पार्श्वभूमी असलेल्या रुग्णावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसमोर अवघड आव्हान होते. मात्र लाईफलाइनमधील चार डॉक्टरांनी तब्बल तीन तासांच्या शस्त्रक्रियेत महिलेवर यशस्वी उपचार केले. या डॉक्टरांनी गायीच्या ह्रदयातील टिश्यूजपासून तयार केलेले हार्ट व्हॉल्वचे महिलेच्या ह्रदयात प्रत्यारोपण केले आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.