२४ कोटींचा बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प १४00 कोटींवर

0
20

तुमसर दि ४ : बावनथडी आंतरराज्यीय (राजीव सागर) प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी १३0 कोटींची गरज आहे. ११ कोटी ६६ लाखांचा प्रकल्प ८१३.८५ कोटींवर पोहोचला आहे. कायद्याच्या कचाट्यात प्रकल्प सापडल्यानेच मागील ३५ वर्षांपासून रखडला आहे. जून २0१७ मध्ये प्रकल्प पूर्णत्वाची तारीख राज्य शासनाने दिली असतानाही त्याच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या प्रकल्पात केवळ१६.७४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. येथे तांत्रिक स्टॉफ केवळ ५0 टक्के आहे. १७ हजार ५00 हेक्टर सिंचन क्षमता असूनही सध्या केवळ ७ हजार हेक्टर शेतीचे सिंचन होत आहे. धरणात यावर्षी पाण्याचा ठणठणाट आहे.
तुमसर तालुक्यातील सितेकसा येथे बावनथडी नदीवर बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प व महाराष्ट्र शासनाचा संयुक्त्त प्रकल्प आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासन येथे संयुक्तरित्याखर्च करीत आहे. या संपूर्ण प्रकल्पाची सध्याची किंमत १६00 कोटींवर पोहोचली आहे. राज्य शासनाने १२ सप्टेंबर १९७५ मध्ये ११ कोटी ६६ लक्ष दरसूचीला प्रशासकीय मान्यता दिली होती.
प्रथम सुधारित मान्यता सन १२ ऑगस्ट १९९३ ला ७१ कोटी ७९ लाख, द्वितीय सुधारित मान्यता ७ डिसेंबर २00१ ला १८२ कोटी १ लाख, तृतीय सुधारित मान्यता २५ ऑगस्ट २00९ ला ५६१ कोटी २६ लाख, चतुर्थ सुधारित मान्यता (प्रस्तावित) ८१३ कोटी ८५ लाख, करण्यात आली आहे.
या प्रकल्पाला पर्यावरण मान्यता २८ एप्रिल १९८९, केंद्रीय जल आयोग मान्यता २१ मे २0१0 ला, नियोजन आयोगाची मान्यता १५ सप्टेंबर २0१0, वन जमिनीस अंतिम मान्यता २0 एप्रिल २0१0 ला तर वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमात अंतभरूत सन २00४-२00५ मध्ये करण्यात आली.
प्रकल्पाचे मुख्य कार्यालय गोंदियात आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ५0 टक्केच तांत्रिक कर्मचारी शिल्लक आहेत. महाराष्ट्र उजवा कालवा मुख्य कालवा असून त्यांची लांबी २६ किमी इतकी आहे. वितरीकेची कामे ३0 ते ३५ टक्के शिल्लक आहेत. तुमसर उपविभागात सुकळी, देव्हाडी तथा मोहाडी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. बघेडा उपविभागीय तुमसर, बोरी, राजापूर येथील कामे शिल्लक आहेत. भूसंपादन येथे ६0 ते ७0 कोटी खर्च येणार आहे. सुमारे १४५ प्रकरणे शिल्लक आहेत. यात ३५१.९४ हेक्टर शेतीचा समावेश आहे.
प्रकल्पाच्या पुर्णत्वाकरिता पुन्हा किमान १३0 कोटी निधीची गरज आहे. सध्या केवळ सात हजार शेतीलाच सिंचन उपलब्ध होत आहे. यात मागील पावसाळी हिवाळी व उन्हाळी पिकांना सिंचनाची सोय करुन देण्यात आली होती. सध्या प्रकल्पात केवळ१६.७४ टक्के जलसाठा म्हणजे ४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणाची क्षमता २१७.३२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यावर्षी पाऊस न झाल्याने धरणात ठणठणाट आहे.