आमगाव बाजार समितीवर भाजपराज

0
11

आमगाव दि ४ : :जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ९ जागा काबीज करून वर्चस्व सिद्ध केले. एक भाजप सर्मथित संचालक निवडून आल्याने भाजपची संख्या १0 झाली आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ५ संचालक निवडून आणण्यात यश आले. काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने आधीच हातमिळवणी केली होती हे विशेष.
आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालकांसाठी रविवारी निवडणूक झाली. ही निवडणूक तीनही प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादीला सत्तेवरून हटविण्यासाठी भाजप व काँग्रेसने संयुक्त आघाडी उभी केली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही बाजार समितीवर पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी ताकद लावली होती. परंतु राष्ट्रवादीला केवळ पाच संचालक निवडून आणण्यात यश मिळाले.
सदर निवडणुकीत सर्वाधिक मते संजय भेरसिंग नागपुरे यांना (४२0) तर दुसर्‍या क्रमांकावर माजी आमदार केशवराव मानकर यांना (३६५) मते पडली. या निवडणुकीत भाजप सर्मथित अपक्ष उमेदवार गोकुल फाफट यांनी व्यापारी आडत्या मतदार संघात सर्वाधिक मते घेवून विजय संपादन केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज करुन वर्चस्व गाजविले होते. यातच अनेक भाजप पुढारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे मनोबल उंचावले होते. त्यामुळे बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पक्षाला यश मिळविण्यासाठी नरेश माहेश्‍वरी व विजय शिवणकर यांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना अपेक्षित यश आले नाही.
सदर निवडणुकीत भाजप व काँग्रेसने युती करून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. माजी आ. केशवराव मानकर यांचे एकहाती नियोजन यशस्वी ठरले. सोमवारी निवडणुकीची मतमोजणी विजयालक्ष्मी सभागृहात घेण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.