फॉक्सकॉन महाराष्ट्रात करणार ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

0
15

मुंबई, दि. ८ – आयफोनसह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये जागतिक स्तरावरील बडी कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने येत्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. महाराष्ट्र सरकारने तैवानस्थित फॉक्सकॉनला या प्रकल्पासाठी दीड हजार एकर जमीन दिली आहे.
चीनमधील आघाडीची कंपनी फॉक्सकॉन आणि राज्य सरकार यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या. कंपनीचे अध्यक्ष टेरी गो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या. सौरऊर्जेवरील डेटा सर्व्हर स्टोरेजच्या उभारणीसह मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही इत्यादी क्षेत्रात फॉक्सकॉन समूह राज्यात गुंतवणुक करणार आहे. मोबाइलमधील हरित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही गुंतवणुकीची तयारी कंपनीने दाखवली आहे.
फॉक्सकॉन कंपनी सध्या अॅपलसह सोनी, नोकियासह अनेक कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवते. जगभरातील बहुतेक कंपन्यांना ही कंपनी संगणकाचे सुटे साहित्याचे उत्पादन पुरवते. चीनमध्ये या कंपनीने लोकांना सर्वाधिक रोजगार दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रॅंड बनलेले गजेटचे उत्पादन महाराष्ट्रात होणार आहे. कंपनीला मुंबई व पुणे पट्ट्यात जमिनीसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चीनचा दौरा केला होता. त्यावेळी फॉक्सकॉन कंपनीने राज्यात गुंतवणूकीची तयारी दर्शवली होती. अखेर आज राज्य सरकार आणि फॉक्सकॉन यांच्यातील करार मार्गी लागला आहे.