कलापथकाने केली ग्राहकांची जागृती

0
22

गोंदिया,दि.३१ : प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असून कोणतीही वस्तू खरेदी करतांना त्याने आपली फसवणूक होणार नाही यादृष्टीने जागृत असणे आज काळाची गरज झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या वतीने ग्राहक जागृती अभियान २०१६ अंतर्गत जिल्ह्यात कलापथकाच्या कार्यक्रमातून ग्राहकांची जागृती करण्यात आली.
पंचरंगी कालापथक अजिमाबादचे प्रमुख कलावंत शाहीर कार्तिक मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी इटखेडा, अर्जुनी/मोरगाव, नवेगावबांध, कोहमारा, देवरी, बामणी, आमगाव, गोंदिया येथील जयस्तंभ चौक व कुडवा नाका येथे नुकतेच कलापथकाचे कार्यक्रम सादर करुन ग्राहकांचे प्रबोधन केले.
वजनमापाबाबत जागरुकता, फसवणूकीपासून सावधान, योग्य वजन, योग्य किंमत, पेट्रोल व डिझेल भरतांना शुन्य पहावे, गॅस सिलेंडर मोजून घ्यावे, ग्राहकांनी वस्तू खरेदी करतांना ती प्रमाणित आहे की नाही ते तपासून पहावे. खोडतोड केलेली किंमत असेल तर अशी वस्तू खरेदी करु नये. दूध, शितपेय, शितपाणी व इतर तत्सम पदार्थ आवेष्ठीत वस्तू स्वरुपात खरेदी करतांना ते सिलबंद आहेत की नाही याची खात्री करावी.
आठवडी बाजारातील भाजीपाला व फळे खरेदी करतांना विक्रेत्यांची तराजू, वजने, मापे व वजनयंत्रांची रितसर पडताळणी व मुद्रांकन झालेली आहेत की नाही याची खात्री करावी. विक्रेत्याने तराजू स्टॅन्डवर लटकवूनच मोजमाप करणे कायदयाने बंधनकारक आहे. मिठाई खरेदी करतांना डब्बा किंवा कार्टनचे वजन समाविष्ठ केलेले नसावे. पिठगिरणीवर वजनमाप असणे बंधनकारक असून धान्य दळतांना धान्य मोजून दयावे व दळलेले पिठ मोजून द्यावे याविषयी माहिती देऊन ग्राहकांचे प्रबोधन केले. कलापथकासोबत ग्राहक जागृती अभियानाप्रसंगी वैधमापन शास्त्र विभागाचे गोंदिया येथील निरीक्षक दिनेश खुरसडे, देवरी येथील निरीक्षक श्री.भुयार, श्री.नागरीकर व सहायक श्री.कुमरे यांची उपस्थिती होती.