दुर्ग-गोरखपूर व गोंदिया-शेगाव गाड्यांची मागणी

0
21

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे झेडआरयूसीसीची बैठक महाव्यवस्थापक सत्येंद्रकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात बालाघाटचे खासदार बोधसिंह भगत, चीनू अजमेरा, हरिंद्र मेठी, कृष्णकुमार बत्रा, प्रताप मोटवानी व हेमराज अग्रवाल तसेच इतर सदस्यांनी प्रवासी सुविधेच्या मागण्या उचलून धरल्या.तसेच गाड्यांच्या थांब्याचे अधिकारी झोनला मिळावे, अशी मागणी करण्यात आली. यावर याचे अधिकार बोर्डाच्याच जवळ असल्याचे महाव्यवस्थापकांनी सांगितले.
याप्रसंगी गोंदिया ते शेगाव दरम्यान जनशताब्दी सारखी रेल्वेसेवा प्रारंभ करणे, बालाघात ते गोंदिया रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हर ब्रिज निर्माण, वाराशिवनी ते तिरोड्यासाठी नवीन रेल्वे लाईन, इतवारी स्थानकावर हावडा जाणार्‍या व येणार्‍या सर्व गाड्यांचे थांबे, गोंदिया ते बालाघाटसाठी गाडीचा (७८८0९) वेळ रात्री १0 वाजे करणे, गाडी (७८८१0) आपल्या जुन्या वेळी ४.५0 वाजता गोंदिया पोहोचावी, नॅरो गेज रेल्वे सेवेच्या स्मृतींच्या प्रतीक स्वरूपात गोंदिया रेल्वे परिसरात लोकोमोटिव्ह इंजिन स्थापित करणे, गाडी (१२४४१) बिलासपूर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या फेर्‍या वाढवून तिला बिलासपूरवरून रविवारी रवाना करणे, गाडी (१२४४२) राजधानी एक्सप्रेस दिल्ली ते बिलासपूर आठवड्यात दोन वेळा येते तिला दरदिवशी व गाडी (१२८४९/१२८५0) बिलासपूर-पुणे आठवडी गाडीच्या फेर्‍या वाढविणे, छिंदवाडा ते आमलावरून नागपूरसाठी रेल्वेसेवा दरदिवशी संचालित करणे, हावडा ते सिकंदराबाद व्हाया चंद्रपूर सरळ रेल्वेसेवा सुरू करणे, गोंदिया व राजनांदगाव रेल्वे स्थानक परिसरात रॅम्प, लिफ्ट व एस्कलेटरची सुविधा अविलंब सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या.
गाडी (११0३९/११0४0) गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसला रायगड, गाडी (१८२0५/१८२0६) दुर्ग-गोरखपूर-दुर्ग एक्सप्रेसला गोंदियापर्यंत व गाडी (१२८५५/१२८५६) बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेसला रायगडपर्यंत विस्तारित करणे आदी विषयांवर पुरजोर चर्चा करण्यात आली. रेल्वे प्रशासनाद्वारे या गाड्यांच्या विस्तारीकरणाबाबत सांगण्यात आले की, गोंदियात रॅकांना ठेवण्यासाठी स्टेबलिंग लाईनची बाध्यता आहे. दुर्ग-गोंदिया एक व्यस्त खंड असून त्याची लाईन क्षमता उपयोगिता १३१ टक्के आहे.
बिलासपूर-नागपूर खंडाची लाईन क्षमता उपयोगिता १२0 टक्के आहे. तसेच गोंदिया-शेगावदरम्यान सेवा प्रारंभ करण्याच्या विषयावर अजमेरा यांना सांगण्यात आले की, या संदर्भात मध्य रेल्वेकडे निवेदन करण्यात आले आहे. स्वीकृती मिळताच याबाबत कार्यवाही करण्यात येईल. संचालन उपमहाव्यवस्थापक हिमांशू जैन यांनी केले.