गंगाझरीतील जलयुक्तची कामे ठरली सिंचनाला आधार

0
24

गोंदिया दि.2-राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन सन २०१५-१६ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवित आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची व शाश्वत सिंचनाची अनेक कामे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी तर जलयुक्त शिवार अभियान हे वरदान ठरले आहे.
गोंदिया तालुक्यातील गोंदिया-तिरोडा मार्गावर असलेले गंगाझरी हे गाव. कृषि विभागाने गंगाझरीच्या परिसरात असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानातून सिमेंट नाला बंधाऱ्याची दुरुस्ती केली. नाला खोलीकरणाचे काम देखील केले. या दुरुस्तीच्या कामामुळे पावसाचे पाणी बंधाऱ्यात साठवू लागले तर नाला खोलीकरणाच्या कामामुळे नाल्यातील सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. नाल्यात पाण्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात होवू लागली. बंधाऱ्यात पाणी अडवून शेतकऱ्यांना धान पिकाच्या सिंचनासाठी मदत होवू लागली. कधी एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात होणारी घट आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे आणि नाल्यातील गाळ शेतीत टाकण्यात आल्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून सिमेंट नाला दुरुस्ती आणि नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली. नाला खोलीकरण करण्यात आल्यामुळे नाल्यात दूरपर्यंत पाण्याची साठवणूक आणि सिमेंट नाला दुरुस्तीमुळे पाण्याची अडवणूक करता येणे शक्य झाल्याचे गोंदिया पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पटले यांनी सांगितले. या कामातून पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत झाली. नाला परिसरातील आणि सिमेंट नाला बंधारा परिसरात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाल्याचेही श्री.पटले यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानातून गंगाझरीजवळील नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. याच नाल्यावर असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची दुरुस्तीचे काम तसेच बोडी खोलीकरणाच्या कामामुळे पाण्याची साठवणूक, पाण्याची अडवणूक करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली. गंगाझरीतील वाहितीखाली असलेल्या २९३.९३ हेक्टर शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले. या शेतीला ७६१.४१ टीसीएम पाण्याची आवश्यकता असतांना जुन्या कामामुळे ५३७.८३ टीसीएम पाणी साठविण्यात आले व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामामुळे २२९.८५ टीसीएम पाणी साठविण्यात आले.
गंगाझरीच्या परिसरात जलयुक्त शिवार अभियानातून बोडी खोलीकरणाची कामे, सिमेंट नाला बंधाऱ्याची दुरुस्ती आणि नाला खोलीकरणाच्या कामामुळे २२९.८५ टीसीएम पाण्याची साठवणूक करण्यात आली. जुन्या कामामुळे व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामातून ७६७.४१ टीसीएम पाण्याची साठवणूक झाली आहे. या पाण्याच्या उपलब्धतेमुळे तर नाला व सिमेंट नाला बंधारा परिसरातील शेतकरी तर सुखावलाच सोबत वन्य व पाळीव प्राण्यांना देखील पाण्याची मुबलक उपलब्धता झाली आहे.