देशाभिमान जागृत होईल तेव्हा जगावर राज्य करू! -खा. पटोले

0
34

अर्जुनी-मोरगाव दि. 3१: : देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र देशाबद्दलचा स्वाभिमान कमी होत चालला आहे. काश्मिरमध्ये अर्धा काश्मिर भारताला भारत मानत नाही. तिरंगा आमच्या देशाची शान आहे. प्रत्येक नागरिकांमध्ये जेव्हा स्वाभिमान जागृत होईल त्या दिवशी आपण जगावर राज्य करू, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
ते वन, पोलीस विभाग व पत्रकार संघातर्फे प्रतापगड महादेव मंदीर मार्गावरील स्वच्छता कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रतापगडच्या सरपंच अहिल्या वालदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खा. नाना पटोले उपस्थित होते. यावेळी मंचावर परिविक्षाधिन वन अधिकारी राहुल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अर्जुनीचे ठाणेदार नामदेव बंडगर, केशोरीचे सहायकपोलीस निरीक्षक एस.एस. कुंभरे, उपसरपंच राऊत, मुकेश जायस्वाल, प्रमोद लांजेवार, डॉ.गजानन डोंगरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष छाया डोंगरवार उपस्थित होते.
खा.पटोले पुढे म्हणाले, केंद्र शासनाने भारत स्वच्छ अभियानाचा संकल्प केला. त्यानुसार स्वच्छता मोहीम राबविली जाते. वन अधिकारी राहुल पाटील यांची उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशंसा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्याची जबाबदारी दिली. हल्ली देशाबद्दलची आपुलकी, स्वाभिमान कमी होत चालला आहे. ज्यावेळी इंग्रजांचे राज्य होते तेव्हा आमच्या जवानांनी छातीवर गोळ्या झेलल्या. बंदूक किंवा बॉम्बगोळ्याच्या आधारावर इंग्रजांना या देशातून परतवून लावता आले नसते. पण देशवासीयांनी जीव गेला तरी चालेल, रक्ताच्या नाल्या वाहल्या तरी चालतील पण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय थांबणार नाही, अशी ताठर भूमिका घेतल्याने देशाला स्वातंत्र्य मिळाले. हल्ली देशात आतंकवाद, नक्षलवाद वाढला आहे. ती आपल्यातीलच लोक आहेत. परंतु दुर्दैवाने घर का भेदी लंका ढहाये, अशी अवस्था आहे.देशाच्या प्रगतीसाठी देशाभिमान जागृत करण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विद्यार्थी आमचे केंद्रबिंदू आहेत. त्यांनी प्रत्येक बाबीची दिशा ठरवा. आत्मविश्‍वास व महत्वाकांक्षा बाळगा. कुठलीच गोष्ट अशक्य नाही. परिस्थितीला बदलविण्याच कामही युवापिढीच करू शकते.कचर्‍यासोबतच समाजातील घाण स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक राहुल पाटील यांनी मांडले. संचालन प्रा.शरद मेश्राम केले. आभार डॉ. राजेश चांडक यांनी मानले.मोहिमेसाठी एस.एस.जे. महाविद्यालय, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो पथक, प्रा.जलील खॉ पठाण, प्रा. इंद्रनिल काशिवार, वन कर्मचारी ब्राम्हणकर, कापगते आदींनी सहकार्य केले.