असे होते सर्जिकल स्ट्राईक

0
11

नवीदिल्ली- ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय. या कारवाईमध्ये जे टार्गेट असतं त्यांच्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोहचणार नाही याची काळजी यामध्ये घेतली जाते. भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांना लक्ष्य करत त्यावर हल्ले चढवले.

‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये कायद्याअंतर्गत बसणा-या गोष्टींचा विचार करूनच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये अप्रत्यक्षरिसुध्दा कोणतीही वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बॉम्बहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बॉम्बहल्ला करण्याच्या हे अगदी विरूध्द आहे. अमेरीकन सैन्याने २००३ मधील इराक युध्दाच्या सुरूवातीच्या काळात बगदादवर केलेला हल्ला हा ‘सर्जिकल स्ट्राईक’चे उदाहरण आहे. यावेळी सरकारी आणि लष्करी इमारतींवर अमेरीकन हवाईदलाच्या विमानांमधून बॉम्बहल्ले करण्यात आले होते.

भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वापर करण्यात आला होता. परंतु, त्याची उघडपणे वाच्यता करण्यात आलेली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच भारतीय लष्कराने केलेली कारवाई प्रसारमाध्यमांसमोर उघड करण्यात आली आहे.