सडक अर्जुनीच्या बीडीओने दाखविला रिव्हॉल्वरचा धाक?

0
13

गोंदिया,दि.30 : गटविकास अधिकाऱ्याने उपसभापतींच्या केबिनमध्ये जाऊन रिव्हॉल्वरचा धाक दाखवत पदाधिकाऱ्यांना तंबी दिली, असा आरोप सडक अर्जुनी पंचायत समितीच्या उपसभापतींनी केला आहे. मिनी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया किंवा शासनाच्या जाहीरात फलकांचे बिल ग्रामपंचायतींनी त्यांच्या खर्चात न घेण्यासाठी पंचायत समितीचे प्रभारी सभापती अडथळा आणत असल्याचा समज करीत बिडीओंनी हा प्रकार केला, असे उपसभापतींचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काही शासकीय कामांचे बिल काढण्यासाठी सडक अर्जुनीचे बिडिओ आनंद लोकरे तालुक्यातील ग्रामपंचायतींवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे बिडिओंच्या कार्यप्रणालीची तक्रार काही पदाधिकाऱ्यांसह जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली. त्या तक्रारीवरुन सीईओ डॉ.पुलकुंडवार यांनी अहवाल मागितला. आपल्याविरूद्ध केलेली ती तक्रार पंचायत समितीचे उपसभापती विलास शिवणकर यांच्या उचकावण्यावरून केल्या गेली, असा गैरसमज करुन सडक अर्जुनी येथील बिडीओ आनंद लोकरे मंगळवारी (दि.२९) दुपारी उपसभापती शिवणकर यांच्या केबिनमध्ये गेले. मात्र शिवणकर नुकतेच केबिनबाहेर गेले होते. त्यामुळे तिथे उपस्थित काही पंचायत समिती सदस्यांना शर्ट वर करून आपल्या कमरेची रिव्हॉल्वर दाखवत लोकरे यांनी उपसभापतींना समजवा, असे म्हणत तंबी दिली, अशी तक्रार शिवणकर यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यात केली.यावेळी उपसभापतींच्या केबिनमध्ये गिरधारी हत्तीमारे, पुरुषोत्तम मेश्राम, मोहन सुरसाऊत, ऋषी मेश्राम, तिमाजी कोरे, आनंदराव गहाणे, जगदीश पंधरे आदी बसले होते. त्यांच्यासमोरच बिडीओंनी हा धमकीवजा इशारा दिल्याचे शिवणकर यांचे म्हणणे आहे.

मी कॅबीनमध्ये गेलो पण अशा प्रकार नाही-लोकरे

यासंदर्भात गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांना विचारणा केली असता त्यांनी मला उपसभापतीनी बोलावले होते परंतु काही काम असल्यामुळे लगेच जाऊ शकलो नाही.थोड्यावेळानी त्यांच्या कॅबीनमध्ये गेलो तेव्हा उपसभापती निघून गेले होते.तेव्हा आपण तिथे उपस्थितांना उपसभापतींना बोलावून घ्या काय अडचणी आहेत त्या आपण बसून चर्चेने सोडवू शकतो असे बोलल्याचे सांगितले.परंतु रिव्हालव्हर असल्याचा कि दाखविण्याचा प्रकार माझ्याकडून घडलेला नसल्याचे त्यांनी बेरार टाईम्सला सांगितले.