आरक्षणासाठी लातुरात मुस्लिम समाजाचा एल्गार

0
17

लातूर, दि. 30 – मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी शहरातील गंजगोलाई ते ईदगाह मैदानावर लाखोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव एकवटले. अतिशय शांततेत आणि कौतुकास्पद पध्दतीने निघालेल्या या मोर्चाने समाजाच्या भावना प्रशासनासमोर मांडल्या. पाच मुलींच्या उपस्थितीत जिल्हाधिकार-यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली.
२०१४ साली महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अध्यादेशामध्ये मुस्लिम समाजाला शिक्षण अन् शासकीय नोकरीमध्ये ५ टक्के अन् मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर केले होते. मात्र सरकारने याचेही कायद्यात रुपांतर केले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला त्या आरक्षणाचा लाभही मिळाला नाही. त्यामुळे आरक्षणासाठी पुन्हा मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्याची वेळ समाजावर आली आहे. त्यामुळे बुधवारी शहरातील गंजगोलाई ते ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढला. हा मोर्चा शांततेत गंजगोलाईतून हनुमान चौक, गांधी चौक, मिनी मार्केट कॉर्नर, अशोक हॉटेल, शिवाजी चौक मार्गे ईदगाह मैदानावर मार्गस्थ झाला. अनेक मुस्लिम बांधवांच्या हातात तिरंगा ध्वज अन् मागण्यांचे फलक दिसून येत होते. सर्वात पुढे तरुण मुले हातात विविध मागण्यांचे बॅनर घेऊन मोर्चामध्ये सहभागी होते. त्यांच्या मागे संयोजन समितीचे पदाधिकारी, वकील, शासकीय, निमशासकीय अधिकारी व सर्वसामान्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हा मूकमोर्चा शांततेत या मार्गावरून मार्गस्थ झाला आणि ईदगाह मैदानावर पोहोचला. दरम्यान, काही मुलींनी आपल्या समाजाच्या मागण्या काय आहेत, याची माहिती उपस्थित समाज बांधवांना दिली.