गडचिरोलीचे शोधग्राम ठरले पहिले सौरग्राम

0
36

गडचिरोली, दि.20: ज्येष्ठ समाजसेवकांची गडचिरोली जिल्ह्यातील कर्मभूमी ठरलेले सर्च संस्थेचे शोधग्राम हे संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारे गडचिरोली जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे. शोधग्राममधील सर्चचे कार्यालय, रुग्णालय, संशोधन केंद्र तसेच कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठीही आता सौर ऊर्जेचा वापर सुरू झाल्याने सुमारे सात लाख रुपयांची बचत शक्य झाले आहे.’थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली’, या उक्तीप्रमाणे चातगावनजीकच्या ‘सर्च’ ने आपल्या संपूर्ण वसाहतीत सौरऊर्जेचा वापर करणे प्रारंभ केले असून, सौरऊर्जेचा परिपूर्ण वापर करणारे ‘सर्च’ हे गडचिरोली जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात बंग दाम्पत्याच्या सर्च संस्थेचे शोधग्राम वसलेले आहे. तालुक्यातील गावांमध्ये रोज सहा ते आठ तास वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे शोधग्राममध्ये दोन डिझेल जनरेटर्सचा वापर करून विजेची गरज भागविली जात होती. मात्र, ते अतिशय महागडे ठरत असल्याने सर्च ने सौर उर्जेच्या वापराचा निर्णय घेतला.
मुंबई येथील ‘सिपला’ फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुमाना हेमिएड यांच्या हस्ते या सौरऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी ‘सर्च’ चे प्रमुख डॉ.अभय बंग, डॉ.राणी बंग, तसेच ‘के’वॅट सोल्युशन्सचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ‘सर्च’ आणि ‘निर्माण’ चे स्वयंसेवक मयूर सरोदे यांच्या पुढाकाराने आयोजित सौरऊर्जेच्या उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी डॉ.अभय बंग यांनी बदलते वातावरण व जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात सौरऊर्जेची गरज आणि महत्व विशद केले. ‘सर्च’ ने आरंभिलेला सौरऊर्जेचा उपक्रम अन्य खेड्यांसाठी आदर्श ठरेल, असा आशावाद डॉ.अभय बंग यांनी यावेळी व्यक्त केला.
सद्‌य:स्थितीत सर्वाधिक वीजनिर्मिती व तिचा वापर करणारा भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे. दरवर्षी भारतात वीजनिर्मिती व तिचा वापरण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांनी वाढत आहे. परिणामी २५.२ टक्के विजेचा तुटवडा महाराष्ट्राला सहन करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यालाही विजेचा तुटवडा नेहमीच सहन करावा लागतो. या तालुक्यातील खेड्यांमध्ये दररोज ६ तास वीजपुरवठा खंडित असतो. अशा स्थितीत ‘सर्च’ दोन डिझेल जनरेटरर्सचा वापर करुन आपली विजेची गरज भागवीत असते. मात्र, ६ तास डिझेल जनरेटर्सचा वापर करुन विजेची गरज भागविणे हे उर्वरित १८ तासांच्या वीजवापराच्या मूल्यापेक्षा अधिक महागडे आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सर्च’ने सौरऊर्जेचा वापर करण्याचे ठरविले. सौरऊर्जेमुळे दरवर्षी ७ लाख रुपयांची बचत होऊ शकते. याउलट पारंपरिक वीजवापर केल्यास तो खर्च १.२ दशलक्ष रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे ‘सर्च’ मधील सौरऊर्जा तेथील इस्पितळ, कार्यालये, संशोधन केंद्र, प्रशिक्षण केंद्रे, कार्यक्रम व परिसरात वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असून, ती त्यांना वरदान ठरणार आहे. बंगलोर येथील ‘विप्रो केअर्स’ ने सौरउर्जेसाठी ‘सर्च’ला ६.६४ दशलक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य केले आहे.
या प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईचे सहकार्य लाभले असून सर्च च्या निर्माण प्रकल्पाचे मयुर सरोदे यांच्या पुढाकाराने सौर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

– विजेच्या खर्चापोटी सर्चला दरवर्षी ७ लाख रुपयांची बचत करणे शक्य होणार.
– बंगळूरु येथील विप्रो केअर्सचे सौर उर्जेसाठी ६० लाख रुपयांचे आर्थिक साह्य.