मूल, पोंभुर्णा व ब्रह्मपुरी तालुके हागणदारीमुक्त

0
13

चंद्रपूर दि.२५: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषद गेल्या तीन वर्षापासून सतत अग्रक्रमावर राहिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशनच्या कामाला जिल्ह्यात गती निर्माण झाली असून जानेवारी महिन्यातच २०१६-१७ या वर्षासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात यश आले आहे. त्यामुळेच सन २०१६-१७ मध्ये मूल, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा ही तीन तालुके हागणदारीमुक्त करण्यात आले आहेत.
वैयक्तीक शौचालय बांधकामात उद्दिष्टापलिकडे जावून ३४ हजार २४३ शौचालय बांधकाम या वर्षात पूर्ण करण्यात आले असून १०१ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. पुढील काळात ६० हजार शौचालय बांधकाम करण्यात येणार आहे. सन २०१६-१७ या वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३३ हजार ७५२ वैयक्तिक शौचालयाचे व मूल, ब्रम्हपुरी ही दोन तालुके हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट होते.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी स्वच्छ भारत मिशनच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचेच फलित म्हणून २०१६-१७ वर्षात मूल, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा ही तीन तालुके हागणदारीमुक्त करण्यात आले आहेत. तर दिलेल्या उद्दिष्टा पलिकडे जावून जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामे केल्या जात आहे. याच नियोजनानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात अंमलबजावणी करुन टप्प्याटप्प्याने तालुके हागणदारी मुक्त करण्यात येणार आहेत.
सन २०१६-१७ या वर्षात बल्लारपुर तालुका हागणदारी मुक्त करुन विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणुन जिल्हा परिषदेला मान मिळाला.हिच प्रेरणा घेवून या वर्षात मूल, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा ही तालुके हागणदारी मुक्त करुन, मुल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदिप पांढरबढे, ब्रम्हपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदिप बिरमवार व तत्कालिन गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार, पोंभुर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे हे यशाचे मानकरी ठरले आहेत.तीन तालुके हागणदारीमुक्त करणारी चंद्रपुर जिल्हा परिषद ही विदर्भातील एकमेव ठरली आहे.