शहीद जवानांचे पार्थिव अकोल्यासाठी रवाना

0
17

नागपूर,berartimes.com,दि. 31 : काश्मिर मधील गुरेचा सेक्टर येथे देश सेवेत असलेले वीर जवान हीमस्खलन होऊन शहीद झालेल्या अकोला जिल्ह्यातील दोन शहीद वीर जवानांचे पार्थिव आज रात्री 8.30 वाजता भारतीय हवाईदलाच्या विशेष विमानाने सोनेगाव येथील एअरफोर्स स्टेशनवर आणण्यात आले. यावेळी सैन्य दलाचा गार्ड रेजिमेंटने मानवंदना दिल्यानंतर वीर जवानांचे पार्थिव विशेष वाहनाने अकोल्यासाठी रवाना झाले.
एअर फोर्स स्टेशनच्या हवाई तळावर अकोला जिल्ह्यातील 13 महार रेजिमेंटचे सैनिक आनंद शत्रुघ्न गवई, रा. पंचशील नगर, वाशिम बायपास रोड आणि संजय सुरेशराव खंडारे, रा.माना, ता. मुर्तिजापूर, जि.अकोला या दोन शहीद जवानांचे पार्थिव रात्रौ आणण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा सेनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे यांनी वीर जवानांना मानवंदना दिली.भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने काश्मिरमध्ये हीमस्खलनात शहीद झालेल्या तीन वीर जवानांचे पार्थिव विशेष विमानाने आणण्यात आले. यापैकी परभणी येथील वीर जवान आंभोरे बालाजी भगवानराव यांचे पार्थिव कामठी येथील सैन्य दलाचा केंद्रामध्ये ठेवण्यात आले असून उद्या बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी हेलिकॉप्टरने नांदेडसाठी रवाना होणार आहे. तेथून परभणी जिल्ह्यातील त्यांच्या स्वग्रामी पार्थिव पाठविण्यात येणार आहे.यावेळी भारतीय हवाई दलाच्या स्कॉडन लीडर मणींदर तसेच जनसंपर्क अधिकारी समीर गंगाखेडकर आदी उपस्थित होते.

अकोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
काश्मीर येथे हीमस्खलन होऊन शहीद झालेल्या अकोला जिल्ह्यातील दोन वीर जवानांवर उद्या बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी शासकीय इतमाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे शहीद आनंद गवई यांच्या अंतीम संस्कारासाठी गीतानगर येथील स्मशान भूमी येथे सकाळी 9 वाजता अंत्ससंस्कार करण्यात येणार आहे. तसेच शहीद जवान संजय खंडारे यांचेवर माना, ता.मुर्तिजापूर येथील गावात संपूर्ण शासकीय इतमामात सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.