आयएसआयच्या रॅकेटमध्ये भाजपच्या आयटी सेलचा सदस्य

0
7

भोपाळ दि.११ : मध्यप्रदेश एटीएसने अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करीत आयएसआयच्या कथित ११ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये भाजपच्या आयटी सेलचा सदस्य ध्रुव सक्सेना असल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचे एक छायाचित्रही सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सोबत हा आरोपी व्यासपीठावर दिसून येत आहे. या प्रकारामुळे सत्तारूढ भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.
मध्यप्रदेश एटीएसचे प्रमुख संजीव शामी यांनी सांगितले की, जम्मूच्या आरएसपुरा भागातून पोलिसांनी २०१६ मध्ये आयएसआयच्या दोन एजंटांना अटक केली होती. पाकिस्तानातील त्यांच्या म्होरक्यांसाठी ते माहिती पाठवीत होते. या दोन जणांकडून चौकशीत असे आढळून आले की, या कामासाठी सतना निवासी बलराम नावाच्या एका व्यक्तीकडून पैसे मिळत होते. त्यानंतर एटीएसने सतना येथून बलराम यास अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर अन्य दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
हे दहा जण देशाच्या विविध भागांतून सीमचे आदान-प्रदान करीत होते. या चौकशीतून असे दिसून आले आहे की, आयएसआयसाठी काम करणाऱ्या बलरामची अनेक बँक खाती आहेत. हवालाच्या माध्यमातून यात पैसा येत होता. हवालामार्फत मिळालेला हा पैसा बलराम अन्य सदस्यांना पाठवीत होता. बलरामला सतना येथून अटक करण्यात आल्यानंतर जबलपूरमधून दोन, भोपाळमधून तीन आणि ग्वालियरमधून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.एटीएसचे असे म्हणणे आहे की, भारतीय टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीशिवाय अवैध एक्स्चेंज करणे शक्य नाही. दरम्यान, काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन करीत आयएसआयच्या विरोधात घोषणाबाजी केली, तर भाजपने हे आरोप फेटाळले आहेत.