वाहतूक रोखून दिव्यांगांचा प्रशासनावर रोष

0
14

गोंदिया,दि. 11 –जिल्हाधिकार्‍यांनी दिव्यांगांना चर्चेकरिता (दि.१0) आमंत्रण दिले होते. त्यामुळे १२ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील दिव्यांग गोळा झाले. परंतु, ऐनवेळी जिल्हाधिकार्‍यांनी बैठक रद्द केल्याचे समजल्यामुळे अलेल्या दिव्यांगांनी दुपारी अमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलिस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी मध्यस्ती केली. एकीकडे दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक देण्याची वल्गना करण्यात येत असताना गोंदियात त्यांची अवहेलना करण्यात आल्यामुळे दिव्यांगानी नाराजी व्यक्ती केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील दिव्यांग महिला आणि पुरूष जिल्हा प्रशासनाच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्या समस्या अद्याप निकाली काढण्यात आलेल्या नाही. परिणामी दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्क अधिकारांपासून दूर राहावे लागत आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांनी २४ ते २७ जानेवारी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत दिव्यांगांच्या मागण्या निकाली काढण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्याचबरोबर मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्याकरिता १0 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग पुरुष आणि महिलांना पाचारण करण्यात आले होते.
त्याप्रमाणे जिल्ह्यातील दिव्यांग (दि.१0) जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. दरम्यान आज ठेवण्यात आलेली सभा रद्द झाल्याचे समजल्यामुळे दिव्यांगानी नाराजी व्यक्त केली. सभा रद्द झाल्याचा निरोप आधी देण्यात आला नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना त्रास सहन करावा लागला, असा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमगाव ते देवरी मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास रोखून धरली. परिणामी वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांना माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार पाटील यांनी मध्यस्ती करत दिव्यांगांची समजूत काढली. एकीकडे केंद्र आणि राज्य शासन अपंग व्यक्तींची वल्गना होवू नये, म्हणून त्यांचे नामकरण दिव्यांग असे करते. त्याचबरोबर दिव्यांगांना सन्मानाने वागणूक देण्याचे आश्‍वासन देत असताना गोंदिया जिल्हा प्रशासन दिव्यांगांना त्रास देत असल्याचा आरोप यावेळी जमलेल्या दिव्यांग व्यक्तींनी केला.