जिल्हा परिषद निवडणुकांवर नक्षली दहशतीचे सावट

0
13

गडचिरोली, दि.१४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात असताना सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे नक्षल्यांनी बॅनर व पत्रकांद्वारे जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याने खळबळ माजली आहे.जिल्ह्यात गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज व कोरची या आठ तालुक्यांमध्ये १६ फेब्रुवारीला, तर भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा तालुक्यात २१ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चामोर्शी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र याच दिवशी भल्या सकाळी सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे तीन ते चार ठिकाणी नक्षल्यांनी कापडी बॅनर लावल्याचे आढळून आले. अनेक ठिकाणी त्यांनी पत्रकेही टाकली होती. पोलिसांनी हे बॅनर व पत्रके ताब्यात घेतली.
या बॅनरवर ‘जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घाला, जल, जंगल व जमिनीवर आदिवासींचा अधिकार लागू करा, शोषणकारी व्यवस्था नष्ट करा, क्रांतिकारी जनताना सरकार स्थापन करा’, असा मजकूर भाकपा(माओवादी)या संघटनेच्या सिरोंचा एरिया कमिटीने लिहिला होता. विशेष म्हणजे, पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विरोधातही या बॅनरवर मजकूर लिहिण्यात आला आहे. अम्ब्रिशराव आत्राम हे भांडवलवादी व लॉयड मेटल्स कंपनीचे दलाल असल्याची जबर टीकाही माओवाद्यांनी या बॅनरवरील मजकुरातून केली आहे. मागील आठवडाभरात माओवाद्यांचे बॅनर आढळण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी एटापल्ली व अहेरी तालुक्यातही असे बॅनर आढळले होते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद निवडणुकीवर नक्षली दहशतीचे सावट कायम आहे.