चक्रवर्ती राजाभोज आदर्श जाणता राजा-पटोले

0
26

भंडारा दि. 28 : अकराव्या शतकात मध्यभारतात अनुशासनप्रिय चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ५५ वर्षे ७ महिने ३ दिवस राज्य केले. त्यांना अखंड भारताचे प्रणेता संबोधले जाते. जोपर्यंत राजाभोज जिवंत होते तोपर्यंत त्यांनी विदेशी राज्यकर्त्यांना भारतातील हद्दीत पाय ठेवू दिला नाही. राजाभोज पोवार समाजाचे गौरव तर होतेच त्याचबरोबर सर्व समाजाकरिता देखील आदर्श जाणता राजा होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.
सिंदीपार येथे आयोजित राजाभोज जयंती समारोह दरम्यान खासदार नाना पटोले बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, सरपंच तुकाराम बोपचे, पृथ्वीराज रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पंचायत समिती सदस्य मोरेश्वरी पटले, प्रेम बोपचे, अ‍ॅड. पुनात्री रहांगडाले, जगदीश येळे, अशोक येळेकर, भास्कर बावणकर, हेमचंद्र बोपचे, रामेश्वर बिसेन, ज्ञानेश्वर येळेकर, उपराज टेंभरे, अशोक पटले, वनिता येळेकर, चैतराम हरीनखेडे, दिनेश येळेकर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खा.पटोले यांनी, सर्व मागासवर्गीय समाजासह आदिवासी लोकांनी एकजुट होऊन सर्व क्षेत्रात विकास करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
बहुजन समाज विभीन्न जाती – जातीमध्ये विभागला आहे. काही षडयंत्रकारी शक्ती बहुजन समाजाला विभागण्याचे कार्य करीत आहेत. हे षडयंत्र हाणून पाडून बहुजन समाजाने संघटीतरित्या विकास साधावा. चक्रवर्ती राजाभोज यांनी त्यांच्या काळात अशा शक्तीविरोधात लढा देऊन सर्व समाजाला जोडण्याचे कार्य केले. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता ते लढत राहिल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मागासवर्गीय जातींनी एकत्र येवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या मार्गावर ओबीसी समाजाने विकास कार्याची कास धरून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार बोलावल्याचे सांगितले व याचा लाभ सर्व समाजाच्या पीडित लोकांनी घेण्याचे त्यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या मुलांकरिता १२५ व मुलींकरिता १२५ विद्यार्थ्यांचे वसतिगृह अनुसूचित जाती जमातीची धर्तीवर राज्य शासनाने सुरु करावे व क्रिमीलेअरची अट रद्द करावी अशी मागणी केली.
बाळा काशिवार यावेळी म्हणाले, पोवार समाजातील युवकांनी व महिलांनी विकास कामाकरिता पुढे यावे, राजाभोज यांचा आदर्श समोर ठेवून युवकांनी व महिलांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा विकास करण्याचे आवाहन केले. यावेळी इतर मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक राष्ट्रीय पवार महासभेचे महासचिव व या जयंती समारोहाचे संयोजक जगदीश येळे यांनी केले.तथा आलेल्या मान्यवरांचे राजाभोय क्षत्रीय पवार समाज सिंदीपारचे सहसचिव अशोक येळेकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला छगन राहांगडाले, धनराज पारधी, शिवराम बघेले, प्रदीप राहांगडाले, सी.टी. पारधी, मनोज पटले, पुरुषोत्तम राणे, पुरुषोत्तम टेंभरे, रेवता पटले, सरिता येळेकर, प्रतिभा येळेकर, रत्नकला पटले, नूतन ठाकरे, सहसराम पटले, राजाभोज जयंती समारोह, राजाभोय क्षत्रिय पोवार समाज सिंदीपारचे सर्व कार्यकर्ते, राजेगाव, मोरगाव, सालेभाटा, केसलवाडा, परसोडी, मासलमेटा, उसगाव, पळसपाणी, किन्ही, सराटी, चिचगाव येथील समाजबांधवांनी सहकार्य केले. यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती.