उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

0
13

वृत्तसंस्था
देहरादून, दि. 11 – उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून सत्तेत आली आहे. भाजपाने 51 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. 70 विधानसभा जागांपैकी भाजपाने 51, काँग्रेसने 16 जागांवर विजय मिळवला आहे. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसेत 15 फेब्रुवारी रोजी 69 जागांसाठी मतदान झालं होतं. एकूण 65.64 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ऊधम सिंह नगरमध्ये सर्वात जास्त 75.79 टक्के मतदान झाल होतं, तर अल्मोडा येथे सर्वात कमी 52.81 टक्के मतदान झालं होतं.
त्तराखंडमध्ये दणदणीत बहुमतासह भाजपाचे सत्तेत पुनरागमन होईल असा अंदाज न्यूज-24 आणि टुडेज चाणक्यने वर्तवला होता. मात्र इंडिया टीव्ही आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केल्याने उत्तराखंडमधील निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
उत्तराखंडचे वर्तमान मुख्यमंत्री हरिश रावत यांनी सत्ता कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. पण भाजपानेही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली होती. दरम्यान, न्यूज 24 आणि टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल भाजपासाठी आनंदाची बातमी घेऊन आला होता. 70 सदस्य असलेल्या उत्तराखंडच्या विधानसभेत भाजपाला 53 जागांसह निर्विवाद बहुमत मिळेल असा दावा या एक्झिट पोलमधून करण्यात आला होता. न्यूज-24 आणि टुडेज चाणक्यने या पोलमध्ये काँग्रेसला 15 आणि इतरांना केवळ दोन जागा दिल्या होत्या.
तर इंडिया टुडे आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये कांटे की लढत झाल्याचे सांगितले होते. या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळण्याची शक्यता होती. सी व्होटरनेही उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 32 जागा मिळतील, असे भाकीत आपल्या एक्झिट पोलमधून केले होते.
उत्तराखंडमध्ये 2012 च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसने 32 तर भाजपाने 31 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या खात्यात 3 जागा गेल्या होत्या. अन्य पक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला होता.