हवाई प्रवास स्वस्त होण्याची शक्‍यता

0
16

नवी दिल्ली दि. 19 –विमान तिकिटाच्या दरांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव संसदीय समितीने केंद्र सरकारसमोर ठेवला आहे. याबाबतचा अहवाल समितीने संसदेसमोर नुकताच मांडला. यामुळे भविष्यात हवाई प्रवास स्वस्त होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
सणासुदीच्या काळात विमान कंपन्या तिकिटांचे दर अवाजवी वाढवितात. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती या विभागांवरील संसदेच्या स्थायी समितीने सरकारसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रत्येक क्षेत्रातील विमान तिकिटांचे विशेषत: “इकॉनॉमी क्‍लास’च्या दरांसाठी मर्यादा निश्‍चित करावी. आपला देश विकसनशील देश असून, विकसित देशातील कार्यपद्धती भारतीय जनता आणि भारतीय परिस्थितीला जुळणारी नाही, असे संसदीय समितीने म्हटले आहे. याबाबत समितीने गेल्या आठवड्यात संसदेत अहवाल मांडला आहे. विमान तिकिट दरांवर मर्यादा घालण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र, तिकिट दर मंत्रालय ठरवत नसून, बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्यावर ठरत असल्याची भूमिका नागरी हवाई वाहतूक मंत्रालय घेत आहे. विमान तिकिट दरांवर मर्यादा घालताना ती कायदेशीररीत्या स्पष्ट असावी लागेल आणि सर्व भागधारकांशी चर्चा करून यावर मार्ग काढावा लागेल, असे समितीने म्हटले आहे.