पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारताचा सर्वाधिक लांबीचा भुयारी मार्ग देशाला अर्पण!

0
15

नईदिल्ली,दि.३-देशातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. उद्घाटनानंतर बोगद्यात काही अंतरापर्यंत जाऊन मोदींनी पाहणीदेखिल केली. एनएच 44 या राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या चेनानी ते नाशरी दरम्यानच्या या बोगद्याचे अंतर 9 किलोमीटर एवढे आहे. यावेळी बोलताना दगडफेक करणाऱ्यांना संबोधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्हाला टुरिझम हवे आहे की, टेररिझम हे तुम्हालाच ठरवावे लागेल.
केवळ बोगदा नाही विकासाच्या दिशेने घेतलेली एक मोठी उडी आहे.हिमालयाच्या छातीत बोगदा तयार करून आम्ही पर्यावरणाचे संरक्षण केले आहे.यासाठी भारत सरकारचा पैसा लागला असला तरी येथील तरुणांचा घामही कामी आला आहे. याठिकाणी तरुणांनी एक हजारापेक्षा अधिक दिवस घाम गाळला. दगड कापून बोगदा तयार केला.दगडाची शक्ती काय असते. एकिकडे भरकटलेले तरुण दगडफेक करतात. तर दुसरीकडे दगड कापून तरुण भारताचे नशीब उजळण्याचा प्रयत्न करत आहे.तुमच्या समोर दोन मार्ग आहेत, एकिकडे टुरिझम आणि दुसरीकडे आहे टेररिझम.40 वर्षे येथे रक्त वाहिले. पर्यटनाची शक्ती ओळखायला हवी. दिल्लीचे सरकार काश्मीरच्या सोबत आहे.तब्बल 9 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे आता प्रवासातील वेळ 2 तासांनी कमी होणार आहे. विशेष म्हणजे हा बोगदा प्रवासासाठी सुरक्षित असून त्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजीदेखिल घेण्यात आली आहे. या बोगद्यासाठी एकूण 2519 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
बोगद्यामुळे रोज जवळपास 27 लाख रुपयांच्या इंधनाची बचत होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या पर्यटनालाही त्यामुळे हातभार लागणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे आता 12 महिने श्रीनगरचा देशाबरोबर संपर्क राहील हवामानामुळे कधीही देशाशी संपर्क तुटणार नाही. तसेच सुरक्षित प्रवास करता येईल.
या बोगद्यात इंटिग्रेटेड टनल कंट्रोल सिस्टम लावण्यात आलेली आहे. त्यामुळे हवा, संवादाची साधणे, वीज यांचा पुरवठा करणे शक्य होईल. तसेच एखाद्या घटनेविषयी माहितीही मिळेल. दर 150 मीटरवर एक एसओएस कॉल बॉक्स आणि अग्निशमण सिस्टीम लावण्यात आले आहे. बोगद्यात आग किंवा इतर दुर्घटनांचा विचार करता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा साधणे लावण्यात आली आहेत. सुरक्षिततेसाठी या बोगद्याबरोबर आणि एक 9 किमीचा बोगदाही आहे.