ईव्हीएम मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

0
6

नवी दिल्ली दि.5-– विरोधकांनी आज राज्यसभेत मतदान यंत्रात (ईव्हीएम) घोटाळा केल्याचा आरोप करत जबरदस्त गोंधळ घातला असून भाजपने ईव्हीएम मुद्द्यावरून सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांनाही चांगलेच सुनावले. बिहार, दिल्लीमध्ये निवडणुकांत विजय मिळाला त्यावेळी ईव्हीएम चांगले होते. पण भाजपने विजय मिळवल्यानंतर ईव्हीएममध्ये फेरफार दिसू लागला. विरोधकांनी आपला पराभव स्वीकारायला हवा, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी विरोधकांना सुनावले.
सरकारला ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करून घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनाच भाजप सरकारने कानपिचक्या दिल्या. विरोधक ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप करून जनादेशाचा अपमान करत आहेत. मात्र, विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ सुरूच ठेवला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्वात आधी ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा मुद्दा लावून धरला. त्यांच्या या आरोपांनंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही त्यांना पाठिंबा दिला होता.
दरम्यान ईव्हीएमवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी काँग्रेसनेही केली. काँग्रेसने बसप प्रमुख मायावती यांचे समर्थनही केले. ईव्हीएमवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही केली. त्यानंतर भाजप सरकारनेही गदारोळ करणाऱ्या विरोधकांना सुनावले. मायावती यांनी पराभव मान्य करावा. अशा प्रकारचे आरोप करून जनतेचा अपमान करू नये, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले.
मध्य प्रदेशातील भिंड येथील ईव्हीएम मशीनचा मुद्दा मायावती यांनी उचलून धरला होता. त्याला काँग्रेसनेही पाठिंबा दिला. सभागृहात यावरून जोरदार गदारोळ झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. दरम्यान, अलिकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले होते. ७२ तासांसाठी ईव्हीएम देण्यात यावेत. मशीनमध्ये कशा प्रकारे गडबड करता येऊ शकतो, हे सिद्ध करून दाखवेन, असे आव्हान दिले होते. निवडणूक आयोगानेही हे आव्हान स्वीकारले आहे.