आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी लागणार पासपोर्ट

0
11

नवी दिल्ली दि.०९-:– आजच्या घडीला विमानाने देशांतर्गत फिरण्यासाठी पासपोर्टची सक्ती नाही. भारतीय रहिवासी विमानाची तिकीट काढून भारतात कुठेही फिरू शकतात. मात्र लवकरच तुम्हाला या विमान प्रवासासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट दाखवण्यास सांगितल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, लवकरच ‘नो फ्लाय’ यादी मंत्रालय जारी करणार आहे. ज्यात चार प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई निश्चित होणार आहे. या चार प्रकारचे गुन्हे केल्यास तुमच्या हवाई प्रवासावर प्रतिबंध असेल. मात्र ही व्यवस्था लागू करण्याआधी प्रवाशांची ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रवाशांना विमान तिकीट बुकिंगच्या वेळी पासपोर्ट किंवा आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. या दोन्हीमधील कोणतेही एक दस्तावेज ग्राह्य धरले जाणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय पुढच्याच आठवड्यात हा नियमांचा एक ड्राफ्ट बनवून जनतेसमोर ठेवणार आहे. जनतेलाही या ड्राफ्टवर अभिप्राय देण्यासाठी ३० दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे.
जून किंवा जुलैमध्ये हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा या ड्राफ्टवर गेल्या काही दिवसांपासून काम करत आहेत. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर हा ड्राफ्ट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आधीपासूनच पासपोर्ट द्यावा लागतो आहे. सरकारला हाच नियम भारतातही लागू करावा लागणार आहे.