हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांपर्यत पोचविण्यासाठी प्रत्येक गावात डिजीटल बोर्ड-फडणवीस

0
16

• राज्यात जूनअखेर सर्वच महसूल मंडळात हवामान केंद्र
नागपूर दि. 30 : हवामानाचा अचूक अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यात प्रथमच स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती प्रत्येक गावात डिजीटल कीऑक्स बोर्डाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अचूक हवामान विषयक पूर्व माहितीमुळे शेतीचे नियोजन करणे सुलभ होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांना समृध्दीकडे नेणारा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यातील पहिल्या महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन नागपूर जिल्हयातील डोंगरगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर होते तर प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, प्रधान सचिव विजयकुमार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, कृषी आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद सदस्य रूपराव शिंगणे, पंचायत समितीचे सदस्य दिलीप नंदागवळी, श्रीमती रेखाताई मसराम, सरपंच देवेंद्रसिंग गौर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
हवामानाचा अचूक अंदाज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती सोबत दुबार पेरणीचेही मोठे संकट सातत्याने येत होते. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दोन हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई मदत म्हणून दयावी लागत होती. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज गावापर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील सर्व महसूल मंडळात 2 हजार 65 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्या महिन्यात एक हजार केंद्र राज्यात सुरू करण्यात येणार आहे. या हवामान केद्रामुळे 12 बाय 12 किलोमिटर परिसरातील अचूक हवामानाची नोंद दर दहा मिनिटाला उपलब्ध होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यासाठी कृषी विभागाने सार्वजनिक – खाजगी भागीदारीतून स्कायमेट सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी केल्यामुळे गावात किती पाऊस पडणार, कसा पडणार तसेच कोणते पीक चांगले होईल तसेच हवामानाच्या बदलाची अचूक माहिती गावात उपलब्ध होणार असल्याने शेकऱ्यांना मोठया संकटाचा सामना करता येणार असल्याचे सांगताना मुख्यमत्री म्हणाले की 50 लाख शेकऱ्यापर्यत एसएमएस व्दारे माहिती पोहचविण्या सोबतच डिजीटल बोर्डाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशेष धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीसाठी वीज व पाणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार सारखे उपक्रम यशस्वी ठरले आहे. जलयुक्तच्या संरक्षित सिंचनामुळे राज्यात 40 हजार कोटी जास्तीचे उत्पन्न झाले आहे तसेच 80 टक्के टँकर कमी झाले आहे. सोलरव्दारे शेतकऱ्यांना अविरत बारा तास वीज देण्याचा देशातील पहिला प्रयोग राज्यात राबविण्यात येणार आहे.
अध्यक्षीय भाषणात कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, निसर्गाच्या लहरीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना गावातच अचूक हवामानाची माहिती उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी प्रगत हवामानाची माहिती घेऊन पिकाचे नियोजन करून उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावे. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना तिसरे पीक घेणे सुलभ झाले असून उन्नत शेती समृध्द शेतकरी या मोहिमेमध्ये सहभागी होवून उत्पादन दुप्पट करण्यासाठी औद्योगिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड द्यावी असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना सर्व औद्योगीक सुविधांची तसेच कृषी विषयक योजनांची माहिती घरापर्यत पोचविण्यासाठी जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सर्व सुविधा ऑनलाइन केल्या असून खरीप हंगामाच्या नियोजनासोबत कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मागणीनुसार विजपुरवठा हे धोरण असल्यामुळे उत्पानादतही वाढ होणार आहे.कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी प्रास्तविकात कृषी विभाग व स्कायमेट वेदर सर्व्हिसेस संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प सुरू झाला असून येत्या जून अखेरपर्यत राज्यातील सर्व 2 हजार 65 मंडळासाठी महसूल विभागातर्फे जागा उपलब्ध झाली आहे. येत्या जून अखेरपर्यत सर्व हवामान केंद्र सुरु होणार असल्याचे सांगितले. संचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी मानले