जीर्ण नोटा स्वीकारणे बँंकांना बंधनकारक – रिझर्व्ह बँक

0
22

मुंबई(वृत्तसंस्था),दि.30- बँका खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा काढावा असेही आरबीआयने सांगितले आहे.
रिझर्व्ह बँकेकडे गेल्या काही दिवसांत रंग लागलेल्या तसेच ज्यांच्यावर काही लिहिले आहे, धुतल्याने रंग उडाला आहे अशा नोटा बँका स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यामध्ये खासकरून ५00 आणि २000 च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयने परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे.
सोशल मीडियावर अशा नोटा बँका स्वीकारणार नसल्याची अफवा परसली होती. बँकांही आठमुठेपणा दाखवत नोटा स्वीकारण्यास नकार देऊ लागल्या होत्या. अफवा वेगाने पसरू लागल्यानंतर आरबीआयने दखल घेत आपल्या २0१३ मधील आदेशाची आठवण करून दिली. खराब नोटा स्वीकारण्यासंबंधी आपण कोणताच आदेश दिला नसल्याचे आरबीआयने त्यावेळी सांगितले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, नोटांवर लिहिण्यासंबंधी जो आदेश देण्यात आला होता तो बँक कर्मचार्‍यांसाठी होता. त्यांनी नोटांवर काही लिहू नये असे सांगितले होते. अनेक बँक कर्मचार्‍यांना नोटांवर लिहिण्याची सवय लागल्याचे लक्षात आल्यानंतर आरबीआयने हा आदेश काढला होता. अशाप्रकारे नोटांवर लिहिणे आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीविरोधात आहेत.