दोन वर्षात दोन हजार तलावातील गाळ काढून दुरुस्तीची कामे करणार-पालकमंत्री बडोले

0
19

गोंदिया,दि.३१ : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना पाणीसाठे वाढविण्यासोबतच शेतीची उत्पादकता देखील वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्यातील ४०० तलावातील गाळ यावर्षी काढण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील दोन हजार तलावातील गाळ काढून त्याच्या दुरुस्तीची कामे करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या तलाव खोलीकरणाच्या कामाला पालकमंत्री बडोले यांनी नुकतीच भेट देवून शिवार संवाद सभेतून मजुरांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे, सरपंच शारदा किरसान, सामाजिक कार्यकर्ते विलास चव्हाण, चेतन वडगाये, गटविकास अधिकारी श्री.लाकडे, सहायक पोलीस निरिक्षक केशव वाभळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जवळपास २०० मजूर उपस्थित होते. विलास चव्हाण यांनी डव्वा परिसरातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना प्रास्ताविकातून अवगत करुन दिले. उपस्थितांचे आभार चेतन वडगाये यांनी मानले.